नवी दिल्ली : कॉक्रोच जनता पक्षाच्या ( सीजेपी ) विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी, या प्रकरणी इतके भावनिक होण्याची गरज नाही असे सांगून तातडीने सुनावणी घेण्याची मागणी सोमवारी फेटाळली. दरम्यान, ‘सीजेपी’बाबत देशभर उत्सुकता निर्माण झाली आहे.
मोहीम सुरूच
जम्मू : राजौरी जिल्ह्यातील घनदाट जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरू करण्यात आलेली ‘ ऑपरेशन शेरोवाली ’ सोमवारी सलग तिसऱ्या दिवशीही सुरू होती. दहशतवाद्यांच्या हालचालींबाबत विशिष्ट माहिती मिळाल्यानंतर लष्कर, जम्मू-काश्मीर पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) यांच्या संयुक्त पथकाने शनिवारी या भागात मोहीम सुरू केली. ती अजूनही सुरूच आहे.
उष्णतेची लाट
जयपूर : राजस्थानच्या अनेक भागात सोमवारी उष्णतेची तीव्र लाट कायम राहिली. हवामान विभागाच्या माहितीनुसार, कोटामध्ये ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. चित्तोडगड आणि श्री गंगानगरमध्ये प्रत्येकी ४५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. पिलानी आणि कोटामध्ये ४४.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. अलवरमध्ये पारा ४४.४ अंश सेल्सिअस, जैसलमेरमध्ये ४४.३ आणि बिकानेरमध्ये ४४.२ अंश सेल्सिअसवर स्थिरावला.
खासदाराचा राजीनामा
भुवनेश्वर : बिजू जनता दलाचे खासदार देबाशिष सामंतराय यांनी सोमवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. पक्षात सापत्न वागणूक मिळत असल्याचा त्यांनी आरोप केला असून, ते लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सामंतराय यांनी पक्ष सोडत असल्याची घोषणा केल्यानंतर ते लगेचच राज्यसभेचे अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली आणि खासदारकीचाही राजीनामा दिला.






