लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कडक निर्देश जारी केले आहेत. सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर नमाज पठणास; तसेच उघड्या जागेत किंवा रस्त्यावर पशुबळी देण्यास मनाई करण्यात आली आहे. पशुबळीनंतर कोणत्याही प्रकारची अस्वच्छता निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
अपघातात चार ठार
बुगेनहाउट : उत्तर बेल्जियममध्ये रेल्वे क्रॉसिंगवर बस आणि रेल्वेच्या धडकेत दोन मुलांसह चार जणांचा मृत्यू झाला, तर इतर पाच मुले जखमी झाली. जखमींची स्थिती चिंताजनक असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. हा अपघात राजधानी ब्रुसेल्सपासून सुमारे ३० किलोमीटर बुगेनहाउट शहराजवळील एका क्रॉसिंगवर सकाळच्या गर्दीच्या वेळी झाला. मृतांमध्ये बसच्या चालकासह चौघांचा समावेश आहे. पोलिस परिसरातील ‘सीसीटीव्हीं’च्या आधारे तपास करीत आहेत.
जैस्वाल भाजपमध्ये
पाटणा : राष्ट्रीय जनता दलच्या माजी नेत्या आणि तेजस्वी यादव यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या रितू जैस्वाल यांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पाटणा येथील भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष संजय सरावगी आणि मंत्री दिलीपकुमार जैस्वाल यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. जयस्वाल यांनी २०२४ची लोकसभा निवडणूक शिवहर मतदारसंघातून ‘आरजेडी’च्या तिकिटावर लढवली होती. यामध्ये त्यांचा पराभव झाला.
कॅनडात १७ अटकेत
ओटावा : दक्षिण आशियाई व्यावसायिक आणि समुदायाच्या सदस्यांना लक्ष्य करून खंडणी आणि संघटित गुन्हेगारीमध्ये कथित सहभाग असल्याच्या आरोपाखाली कॅनेडियन पोलिसांनी भारतीय वंशाच्या १७ जणांना अटक केली आहे. खंडणी विरोधी दलाने ही कारवाई केली. अटक केलेल्यांपैकी बहुतेकांचे संबंध ‘फॉर ब्रदर्स’ नावाच्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्कशी आहेत.
कठुआत ड्रोन आढळले
जम्मू : जम्मू आणि काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात संशयास्पद ड्रोन आढळल्याने सुरक्षा यंत्रणांनी पाळत वाढवली असून तपास सुरू केला आहे. सोमवारी रात्री हटली पट्ट्यातील गोविंदसर रेल्वे स्थानक रस्त्याजवळ ड्रोन आढळले. यामुळे लष्करासह पोलिसांनी परिसरात शोधमोहीम वाढवली आहे.
टाकी फुटून जखमी
लाँगव्ह्यू (अमेरिका) : वायव्य वॉशिंग्टन राज्यातील कागद कारखान्यात मंगळवारी सकाळी रासायनिक द्रव्य असलेली टाकी फुटून अनेक जण भाजले असून, अनेकांना श्वसनाचा त्रास झाल्याचे मंगळवारी सांगण्यात आले. या घटनेत किती जण जखमी झाले, हे तत्काळ स्पष्ट झाले नाही. या कारखान्यात टिश्यू, मुद्रण कागद, कप, प्लेट, कार्टन आणि इतर वस्तूंसाठी साहित्य तयार केले जाते. येथे सुमारे एक हजार कर्मचारी काम करतात. अग्निशमन विभागाचे ४० जवान आणि डॉक्टरांचे पथक दाखल झाले होते.









