काँग्रेस सूत्रांनी महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी यावेळेस बंगळुरू सोडण्यापूर्वीच पक्षनेतृत्वाला संकेत दिले होते, की राहुल गांधींनी सांगितल्यास ते राजीनामा देण्यास तयार आहेत. मात्र काँग्रेस पक्षश्रेष्ठी सध्या कोणताही मोठा निर्णय घेण्याची घाई करून धोका पत्करण्याच्या मानसिकतेत दिसत नाही. सिद्धरामय्या यांना पदावरून हटवल्यास राज्यातील ओबीसी समाजाला चुकीचा संदेश जाऊ शकतो, अशी चिंताही पक्षनेतृत्वास आहे.
काँग्रेसमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातील नेतृत्वबदलाचा वाद पुन्हा उफाळून आल्यावर पक्षनेतृत्वाने दिल्लीत मंगळवारी मॅरेथाॅन बैठका घेतल्या व अखेर याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
दिल्लीतील बैठक केवळ कर्नाटकमधील आगामी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकांच्या उमेदवारांवर केंद्रित होती, असे काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले. सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाशी (सोनिया गांधी आणि राहुल गांधी) दिल्लीत झालेल्या बैठकांचा मुख्य अजेंडा राज्य मंत्रिमंडळ विस्तार आणि पक्षातील गटबाजी संपवणे हा होता. परंतु अजूनही सिद्धरामय्या यांना पदावरून हटवण्यापूर्वी राज्यातील ओबीसी मतदारांच्या नाराजीची काँग्रेस नेतृत्वाला वाटणारी भीती कायम असल्याचे त्यांना यावेळी पुन्हा मिळालेल्या अभयदानावरून स्पष्ट झाले आहे. मात्र, बैठकीतील घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांचे पेव फुटले. त्यामुळे सध्या तरी राज्यातील खांदेपालटाची शक्यता आणि थंडावली आहे.









