पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बशीरहाट उपविभागातील हकीमपूर तपासणी नाक्यावर मोठ्या संख्येने बेकायदा बांगलादेशी नागरिक जमल्याची माहिती मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांनी मंगळवारी दिली. त्यांच्या हद्दपारीची प्रक्रिया गतीमान करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. नादिया, हुगळी आणि उत्तर २४ परगणा जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कल्याणी येथे झालेल्या प्रशासकीय बैठकीनंतर अधिकारी पत्रकारांशी बोलत होते.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाच्या चर्चेला खतपाणी घालणारी घटना मंगळवारी घडली. पक्षाच्या ज्येष्ठ खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी सहा आमदारांसह कल्याणी येथे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी घेतलेल्या प्रशासकीय आढावा बैठकीला हजेरी लावल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.
खासदार घोष दस्तीदार यांच्याव्यतिरिक्त, बैठकीला उपस्थित असलेल्यांमध्ये देगंगाचे तृणमूल काँग्रेस आमदार अनिसुर रहमान बिस्वास, स्वरूपनगरच्या बिना मोंडल, हरोआचे मोहम्मद अब्दुल मतीन आणि बशीरहाट परिसरातील आणखी तीन आमदारांचा समावेश होता. या पूर्वी संसदीय पक्षाच्या मुख्य प्रतोद पदावरून हटवून त्यांच्या जागी कल्याण बॅनर्जी यांची नियुक्ती केल्यानंतर, घोष यांनी समाजमाध्यमांवर लिहिले होते, ‘१९७६पासूनचा संबंध, १९८४मध्ये प्रवास सुरू झाला. आज चार दशकांच्या निष्ठेचे मला हे बक्षीस मिळाले,’ या पोस्टमुळे पक्षांतर्गत धुमसत्या असंतोषाबाबत अटकळी सुरू झाल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतील घोष यांची उपस्थिती राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरली. ‘प्रशासन सर्वांचे असते,’ असे घोष दस्तीदार म्हणाल्या. उपस्थित ‘तृणमूल’ आमदारांनीही ते केवळ विकासाच्या प्रश्नांसाठी बैठकीला आले असल्याचे सांगितले. दरम्यान अन्य एक ज्येष्ठ राज्यसभा खासदार सुखेंदू शेखर रॉय यांनीही मंगळवारी ‘एक्स’च्या माध्यमातून पक्षविरोधी मतप्रदर्शन केले.
घेराव प्रकरणात १५ अटकेत
कोलकाता : ‘एसआयआर’ प्रक्रियेविरोधातील आंदोलनादरम्यान न्यायिक अधिकाऱ्यांना घेराव घातल्या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) १५ आंदोलकांना अटक केली.









