इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी याच शैक्षणिक वर्षापासून तीन भाषा अनिवार्य करणारी अधिसूचना मागे घ्यावी, अशी विनंती भारतीय जनता पक्षाचे तमिळनाडूतील नेते के. अण्णामलाई यांनी मंगळवारी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला केली. त्याऐवजी शैक्षणिक वर्ष २०२९-३० पासून हे त्रिभाषा सूत्र लागू करावे आणि तीनपैकी दोन भाषा भारतीय असाव्यात, असे म्हटले आहे.
‘सीबीएसईचा हा निर्णय अनेक पालकांसाठी, विशेषतः तमिळनाडूतील पालकांसाठी धक्कादायक ठरला आहे; कारण त्यांच्या मुलांनी सहावीतच आपल्या पसंतीची भाषा निवडलेली आहे. अधिसूचनेनुसार एक जुलै २०२६ पासून नववीच्या विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकणे बंधनकारक असेल. इतक्या कमी वेळात विद्यार्थ्यांकडून नवीन भाषा शिकण्याची अपेक्षा केल्यास मुलांवर दबाव येईल,’ असे अण्णामलाई यांनी ‘एक्स’वर म्हटले.









