आंबा तैवानला, मिरची चीनला!

महाराष्ट्र टाइम्स

भारतातील एका खासदाराने तैवानच्या प्रतिनिधीला हापूस आंब्याची भेट पाठवली. या भेटीमुळे चीनने नाराजी व्यक्त केली असून भारत-चीन संबंधात तणाव निर्माण झाला आहे. तैवान आणि भारत यांच्यातील व्यापार वाढत असताना ही घटना घडली आहे. या घटनेमुळे नवी दिल्लीत चर्चा सुरू झाली आहे.

taiwans mangoes have created tensions in china

भारत आणि तैवानमधील द्विपक्षीय व्यापार १२ अब्ज डॉलरपेक्षा अधिक झाला आहे. सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रात तैवान भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा भागीदार आहे. तैवानच्या धोरणात भारत केंद्रस्थानी आहे. भारतीय विद्यार्थी मोठ्या संख्येने तैवानमध्ये उच्च शिक्षणासाठी जात आहेत. नवी दिल्लीतील तैपेई इकॉनॉमिक अँड कल्चरल सेंटर आणि मुंबई व चेन्नईतील केंद्रे ही दूतावासाची सर्व कामे व्हिसासह अनौपचारिकपणे पार पाडतात.

अतिउत्साहाच्या भरात केलेली एक छोटी कृती दोन देशांच्या संबंधातील तणाव वाढविण्यास कशी कारणीभूत ठरते याचा अनुभव सध्या दिल्लीतील चर्चेचा विषय ठरला आहे. महाराष्ट्रातील तरुण खासदाराने दिल्लीमध्ये अनेक मान्यवरांना हापूस आंब्याच्या पेट्या भेट म्हणून पाठविल्या. त्यातील एक पेटी गेली ‘तैपेई इकॉनॉमिक अँड कल्चरल सेंटर’कडे आणि तिथूनच सगळा घोळ सुरू झाला.

तैवानच्या या कार्यालयाने आंबे आनंदाने स्वीकारले, आभार मानले आणि हे आभार मानताना ही गोष्ट जगजाहीर होईल, याचीही चोख काळजी घेतली. तैवानवर मालकी सांगणाऱ्या चीनच्या गुप्तचरांच्या नजरेतून ही बाब सुटणार कशी? तैवानी कार्यालयात पसरलेला हापूसचा घमघमाट थेट बीजिंगपर्यंत पोहोचला आणि चिनी चेहरे आंबट झाले. चीनने थेट पंतप्रधान कार्यालयाकडे याबाबत लेखी नाराजी नोंदवल्याचे विश्वसनीय सूत्रांनी समजते. पंतप्रधान कार्यालयाकडून ही माहिती मिळताच संबंधित खासदाराच्या कार्यालयाने सारवासारव सुरू केल्याचेही कळते.