मे महिन्यातील नऊ दिवस एकदम कडऽऽऽक

Contributed byललित पतकीLalit.Patki@timesofindia.com|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

उष्णतेच्या लाटेचा तडाखा; नागरिक हैराण

Maharashtra Times

नागपूर : मे महिन्यात आतापर्यंतच्या २६पैकी तब्बल नऊ अर्थात सुमारे ३० टक्के दिवसांमध्ये नागपुरात उष्णतेच्या एकदम कडक लाटेची नोंद झाली आहे. यात १९ ते २६ मे यादरम्यान सलग आठ दिवस ही लाट कायम राहिली असून शहरवासी हैराण झाले आहेत. यंदा २० मे रोजी ४६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, गेल्या दहा वर्षांतील हा सर्वाधिक तापमानाचा विक्रम ठरला आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात नागपूरकरांना उष्णतेच्या तीव्र झळांचा सामना करावा लागत असून, मे महिन्यात उष्णतेच्या लाटेचे सातत्य गेल्या काही वर्षांच्या तुलनेत अधिक राहिल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे १९ मे ते २६ मे या सलग आठ दिवसांमध्ये शहरात दररोज उष्णतेच्या लाटेची स्थिती कायम होती. याखेरीज १५ मे रोजीही उष्णतेची लाट नोंदविण्यात आली होती. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यातील २६ आणि २७ हे दिवस व मे महिन्यातील नऊ दिवस धरून आत्तापर्यंत एकूण ११ दिवस उष्णतेच्या लाटेची नोंद झाली आहे. जून महिना अद्याप बाकी असला तरी सुरुवातीच्या पंधरवड्यातही उष्णतेची लाट कायम राहू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, आता तापमानात काहीशी घसरण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. दरम्यान, विदर्भातील उष्णतेच्या लाटेवरील अलीकडेच झालेल्या संशोधनानुसार, नागपूरमध्ये उष्ण दिवसांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. २०११ ते २०२० हे दशक सर्वाधिक उष्ण ठरल्याचे संशोधनात नमूद करण्यात आले आहे. तसेच २०२०नंतरही तापमानात चांगलीच वाढ होताना दिसून येते आहे.

दरम्यान, मंगळवारीसुद्धा विदर्भातील बहुतांश शहरांमध्ये उष्णतेची लाट होती. यात ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ४६.६ तर नागपुरात ४५.७ अंश तापमान होते.