नागपूर : रोजगार संघ आणि युवा कल्याण सेवा संघाच्यावतीने तसेच ग्रामपंचायत खसाळाच्या सहकार्याने पर्यावरणदिनी, ५ जून रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन कामठी तहसीलमधील ग्रामपंचायत खसाळा येथे सकाळी १० वाजता करण्यात आले आहे. कार्यक्रमादरम्यान उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सरपंचांचा गौरव केला जाईल. तसेच वृक्ष लागवड आणि संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्थेला वृक्षसखा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी रोजगार संघाचे अध्यक्ष संजय नाथे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद नागपूरचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा. डॉ. कमलकिशोर फुटाणे आणि विशेष पाहुणे म्हणून कामठीचे गटविकास अधिकारी बाळासाहेब असतील. यशस्वितेसाठी खसाळा ग्रामपंचायतीच्या सरपंच जयश्री इंगोले, गजानन बोबडे, उद्धव साबळे, वसंत वराडे, अश्विनी पारधी, मीना पाटील आणि विनोद पन्नासे यांनी केले आहे.
गुणवंता विद्यार्थ्यांचा सत्कार शनिवारी
नागपूर : युवा ग्रॅज्युएट फोरमच्यावतीने उत्तर नागपुरातील दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन शनिवार, ३० मे रोजी कामठी मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर येथे सायंकाळी ५ वाजता करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी संविधान फाउंडेशनचे संस्थापक ई. झेड. खोब्रागडे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर महापालिकेचे आयुक्त डॉ. विपीन इटनकर आणि फॉरेन एज्युकेशन कौन्सिलर हेमंत सुटे उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. सत्कार सोहळ्यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांची नाव नोंदणी सुरू झाली असून, इच्छुकांनी आयोजकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.









