दुचाकींचे उत्पादन करणाऱ्या ‘ हिरो मोटोकॉर्प ’तर्फे तीन जूनला देशातील पहिली ‘फ्लेक्स फ्युएल’ मोटरसायकल सादर करण्यात येणार आहे. या माध्यमातून पेट्रोलवरील अवलंबित्व कमी करण्याच्या आणि ग्रीन मोबिलिटीला चालना देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.
‘ई-वाहनां’ना पर्याय
‘फ्लेक्स फ्युएल’ तंत्रज्ञानाकडे आगामी काळात इलेक्ट्रिक वाहनांना पर्याय म्हणून पाहिले जात आहे. या तंत्रज्ञानाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, ही बाइक सामान्य पेट्रोलसोबतच अधिक इथेनॉलमिश्रित इंधनावरही धावू शकते. त्यामुळे केवळ प्रदूषणच कमी होणार नसून, सामान्य जनतेचा इंधनावरील खर्चही कमी होऊ शकतो, असा ‘हिरो मोटोकॉर्प’चा दावा आहे. हे पाऊल म्हणजे आपल्या ग्रीन मोबिलिटी योजनेचा एक भाग असल्याचे कंपनीतर्फे नमूद करण्यात आले. वाहन उद्योगातील सातत्याने बदलणारे तंत्रज्ञान आणि सरकारचे नवीन धोरण पाहता, कंपनीने पारंपरिक इंधनांवरील वाहनांपेक्षा अपारंपरिक इंधनांवरील वाहने सादर करण्याचे ठरवले आहे.
‘फ्लेक्स’ कसे काम करते?
‘फ्लेक्स फ्युएल’ इंजिन वेगवेगळ्या प्रमाणात इथेनॉलमिश्रित पेट्रोलवर चालू शकते. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, या तंत्रज्ञानावर आधारित बाइक ‘ई-२०’पासून (२० टक्के इथेनॉल) ते ‘ई-८५’पर्यंतच्या (८५ टक्के इथेनॉल) इंधनावर काम करू शकते. इथेनॉल हे एक जैव इंधन असून, ते ऊस आणि इतर कृषी उत्पादनांपासून तयार केले जाते. यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होते आणि आयात केल्या जाणाऱ्या कच्च्या तेलावरील अवलंबित्व घटते.




