कर्नाटकमध्ये अखेर नेतृत्वबदल?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

कर्नाटकात काँग्रेसमध्ये नेतृत्वबदलाची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज राजीनामा देण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासाठी मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे आहेत. दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींसोबत झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाल्याचे समजते. शिवकुमार यांच्या समर्थकांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे.

leadership change in karnataka as siddaramaiah likely to resign

कर्नाटकमध्ये तीन वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या काँग्रेसच्या नेत्यांमध्ये ठरलेल्या सत्तावाटप सूत्रानुसार राज्यात नेतृत्वबदल होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज, गुरुवारी राजीनामा देण्याची शक्यता असून, या पदासाठी गेल्या काही महिन्यांपासून मोर्चेबांधणी करणारे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचा नेतृत्वपदाचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मंगळवारी दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींसोबत दीर्घ चर्चा केली. त्यात राज्यसभा आणि विधान परिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत असले, तरी राज्यातील नेतृत्वबदलाचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी होता, असे समजते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी सकाळी सहकारी मंत्र्यांना न्याहारीचे निमंत्रण दिले असून, या वेळच्या बैठकीत ते मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याची घोषणा करून राजीनामा राज्यपालांकडे सादर करतील, अशी चर्चा आहे. मात्र, याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत असून, आपण गुरुवारीच बोलणार असल्याचे सिद्धरामय्या यांनी बुधवारी सांगितले.

राज्यात अनेक महिन्यांपासून नेतृत्वबदलाची चर्चा सुरू आहे. राज्यातील काँग्रेस सरकारला २० नोव्हेंबर २०२५ रोजी अडीच वर्षे पूर्ण झाल्यानंतर डी. के. शिवकुमार यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी भेटीगाठी घेऊन चर्चेला जोर दिला होता. दिल्लीत मंगळवारी झालेल्या बैठकीत पक्षश्रेष्ठींनी सिद्धरामय्या यांना पायउतार होण्याची सूचना केल्याची चर्चा आहे. मात्र, पक्षाने याबाबत गुप्तता पाळली आहे. मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत नाव येणारे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनीही याबाबत भाष्य करण्यास नकार दिला. ‘सिद्धरामय्या यांची पक्षनेतृत्वाशी काय चर्चा झाली नाही, याबाबत कोणालाही कल्पना नाही,’ असे सांगताना परमेश्वर यांनी ‘पक्षाचा निर्णय प्रत्येकाला मान्य करावा लागतो’ असे सांगितले.

सिद्धरामय्या यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आर. व्ही. देशपांडे यांनी सांगितले. देशपांडे यांनी सिद्धरामय्या यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

बेंगळुरू : काँग्रेसने कर्नाटकमधील नेतृत्वबदलाबाबत अधिकृत घोषणा केली नसली, तरी डी. के. शिवकुमार यांच्या समर्थकांनी बुधवारी फटाके वाजवून आणि पेढे वाटून जल्लोष केला. शिवकुमार यांच्या बेंगळुरूतील सदाशिवनगर येथील निवासस्थानाजवळ त्यांच्या समर्थकांनी शक्तिप्रदर्शन केले. शिवकुमार यांचे नेतृत्व कणखर असून, त्यांनीच २०२३च्या निवडणुकीत पक्षाला दणदणीत विजय मिळवून दिला, असे या वेळी त्यांच्या एका समर्थकाने सांगितले.