इराणसोबत युद्धबंदी करार होत नसल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी रात्री केली. आम्ही आमचे काम कोणत्याही प्रकार संपवू, अशा शब्दांत त्यांनी युद्धाचे सूतोवाच केले. युद्धासाठी सज्ज असल्याचे युद्धमंत्री पीट हेगसेथ यांनी या वेळी सांगितले.
इराणसंदर्भात चर्चा करण्यासाठी अमेरिकेच्या मंत्रिमंडळाची ट्रम्प यांनी बैठक बोलावली होती. बैठकीला परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ, युद्धमंत्री पीट हेगसेथ उपस्थित होते. त्यानंतर एकत्रित पत्रकार परिषदेत ट्रम्प म्हणाले, ‘इराणला करार करायचा होता. मात्र, ते हवेत चर्चा करत होते. तो होऊ शकला नाही. आम्ही काही मुद्द्यांबाबत समाधानी नाही. आम्हाला अन्य देशांकडून पाठिंबा मिळाला. ते (इराण) मला वाट पाहायला लावत होते. मुदतपूर्व निवडणुकांपर्यंत आपण थांबू असे त्यांना वाटत होते. मात्र, मला मुदतपूर्व निवडणुकीची पर्वा नाही.’
‘इराणकडे अण्वस्त्रे असणार नाहीत, ही भूमिका स्पष्ट आहे. चर्चेने मार्ग काढण्याचा पर्याय आहे. मात्र, त्याचा उपयोग न झाल्यास अध्यक्षांकडे (ट्रम्प) अन्य मार्ग आहेत,’ असे परराष्ट्रमंत्री रुबिओ म्हणाले.
हेगसेथ यांनी युद्धासाठी सज्ज असल्याचे स्पष्ट करतानाच जगात कुठेही इराणचे टँकर सुरक्षित नसल्याचे सांगितले. ‘जर तुमच्या (ट्रम्प) चर्चेने मार्ग सुटत असेल तर ठीक; अन्यथा युद्ध विभाग स्वत:च्या पद्धतीने काम पूर्ण करेल, त्यासाठी आम्ही सज्ज आहोत,’ असेही हेगसेथ म्हणाले.



