‘शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) प्रशासनाने इबोलाचा सामना करण्यासाठी कंबर कसली आहे. ‘इबोलाबाधित किंवा संशयित रुग्णांवर उपचारासाठी मेडिकलमध्ये एक स्वतंत्र चार खाटांचा विशेष कक्ष (आयसोलेशन वॉर्ड) तयार करण्यात आला आहे. भविष्यात रुग्णांमध्ये वाढ झाल्यास खाटांची संख्याही वाढवण्यात येईल. रुग्णांसाठी आवश्यक असणारी जीवनरक्षक औषधे आणि उपकरणांची सोय तसेच तेथे सेवा देणाऱ्या डॉक्टरांसाठी पीपीई किटची व्यवस्थाही करण्यात आली आहे’, असे मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी सांगितले.
आफ्रिकेतील देशांमध्ये इबोला नावाच्या विषाणूने थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर युगांडाहून नागपुरात परतलेल्या एका ४७वर्षीय प्रवाशाला प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून २१ दिवसांसाठी गृह विलगीकरणात (होम आयसोलेशन) ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
संबंधित प्रवासी युगांडात कोणत्याही इबोलाबाधिताच्या संपर्कात आलेला नव्हता, तरीही सुरक्षेचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने हे पाऊल उचलल्याची माहिती आहे. इबोला विषाणूचा धोका बघता मेडिकल-मेयो व इतर सार्वजनिक रुग्णालयेही हाय अलर्टवर आहेत.
प्राप्त माहितीनुसार, संबंधित नागरिक युगांडात वास्तव्याला होता. नागपूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर विमानतळावरील आरोग्य प्रशासनातर्फे त्याची प्राथमिक तपासणी करण्यात आली. त्यात इबोलाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. मात्र, इबोला विषाणूचा इन्क्युबेशन पीरिएड (लक्षणे दिसण्याचा कालावधी) लक्षात घेता, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्याला पुढील २१ दिवस घरातच विलगीकरणात राहण्याचे आदेश देण्यात आले. या प्रवाशाच्या तब्येतीवर मनपाच्या आरोग्य विभागाचे विशेष पथक पुढील २१ दिवस लक्ष ठेवणार आहे. मनपाचे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चमू दररोज त्याची तपासणी करणार आहे.
‘परदेशातून विशेषत: आफ्रिकेतील देशातून येणाऱ्या प्रवाशांची दररोज विमानतळावर प्राथमिक तपासणी करण्यात येत आहे. ज्या प्रवाशाला इबोलाची लक्षणे आढळतील आणि ज्याला लक्षणे आढळली नाहीत परंतु तो तेथील इबोलाबाधितांच्या संपर्कात आला होता, अशा रुग्णांना थेट मेडिकलमधील आयसोलेशन विभागात दाखल करण्यात येणार आहे. तसेच ज्या रुग्णाला लक्षणेही आढळली नाही आणि तो इबोलाबाधितांच्या संपर्कातही आला नाही अशा व्यक्तीला शहरात त्याच्या राहत्या घरीच २१ दिवसांसाठी गृह विलगीकरणात ठेवले जाणार आहे’, असे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी सांगितले.









