वैभव सूर्यवंशीच्या आक्रमक ९७ धावा आणि ध्रुव जुरेलचे अर्धशतक यानंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेतील एलिमिनेटर लढतीत सनरायझर्स हैदराबाद संघावर ४७ धावांनी मात केली. या विजयासह राजस्थान संघाने ‘क्वालिफायर-२’मध्ये प्रवेश केला. आता २९ मे रोजी ‘राजस्थान’ची लढत गुजरात टायटन्स संघाशी होईल. या पराभवाने ‘हैदराबाद’चे आव्हान संपुष्टात आले.
राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद २४३ धावा केल्या. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना ‘हैदराबाद’चा डाव
१९.२ षटकांत १९६ धावांत आटोपला. ‘हैदराबाद’ची सुरुवात निराशाजनक झाली. जोफ्रा आर्चरने पहिल्याच चेंडूवर अभिषेक शर्माला बाद केले. यानंतर ट्रेव्हिस हेड आणि ईशान किशनकडून अपेक्षा होती. मात्र, या दोघांनाही चांगल्या सुरुवातीचे रूपांतर मोठ्या खेळीत करता आले नाही. यानंतर हेन्रिच क्लासेनवर मदार होती. मात्र, त्यानेही निराशा केली. ‘हैदराबाद’ची ६.५ षटकांत ५ बाद ८१ अशी स्थिती झाली आणि तेथेच त्या संघाचा पराभव निश्चित झाला. तळाच्या फलंदाजांनी ‘हैदराबाद’ला दोनशे धावांच्या समीप पोहोचवले; पण तोपर्यंत त्यांच्या आक्रमणातील हवाच निघून गेली होती.
तत्पूर्वी, ‘हैदराबाद’ने नाणेफेक जिंकून ‘राजस्थान’ला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले खरे; पण ‘राजस्थान’चा हुकमी एक्का १५ वर्षीय वैभवला झटपट रोखण्यात ‘हैदराबाद’ला अपयश आले. ‘राजस्थान’च्या डावात सर्व काही वैभव होता. त्याने पुन्हा एकदा गोलंदाज कोण आहेत, हे आपल्यासाठी महत्त्वाचे नसते हे दाखवून दिले. या वेळी त्याने महत्त्वाच्या सामन्याचेही आपण दडपण घेत नाही हे दाखवले. वैभवला रोखण्यासाठी केलेला यॉर्करचा वापर ‘हैदराबाद’वर बूमरँगसारखा उलटला. हळूवार चेंडू, चेंडूच्या टप्प्यात केलेले बदल सर्व काही विफल ठरत होते. त्याची बॅट प्रत्येक चेंडूवर तलवारीसारखी चालत होती. ‘हैदराबाद’च्या क्षेत्ररक्षकांना चेंडू सीमेपलीकडून आणण्याचेच काम राहिले. तो विक्रमी वेगवान शतकाच्या समीप असताना बाद झाला.
वैभव परतल्यावर ध्रुव जुरेलने २० चेंडूंत अर्धशतकी चोप देऊन वर्चस्व कायम ठेवले. मात्र, डावाच्या उत्तरार्धात ‘राजस्थान’ची धावगती वेगाने कमी होऊ लागली. पहिल्या सहा षटकांत ८० धावा करणारे ‘राजस्थान’ अखेरच्या पाच षटकांत ३६ धावाच करू शकले.
संक्षिप्त धावफलक : राजस्थान रॉयल्स - २० षटकांत ८ बाद २४३ (यशस्वी जयस्वाल २९ (२९ चेंडूंत ४ चौकार), वैभव सूर्यवंशी ९७ (२९ चेंडूंत १२ षटकार, ५ चौकार), ध्रुव जुरेल ५० (२१ चेंडूंत ५ चौकार, ३ षटकार), रियान पराग २६, ईशान मलिंगा ४-०-४०-१, प्रफुल हिंगे ४-०-५४-३, शिवांगकुमार २-०-१९-१, नितीशकुमार रेड्डी २-०-१२-१) वि. वि. सनरायझर्स हैदराबाद - १९.२ षटकांत सर्व बाद १९६ (ईशान किशन ३३ (११ चेंडूंत ३ चौकार, ३ षटकार), ट्रेव्हिस हेड १७, हेन्रिच क्लासेन १८, नितीशकुमार रेड्डी ३८, सलिल अरोरा ३५, शिवांगकुमार २७, जोफ्रा आर्चर ४-०-५८-३, नांद्रे बर्गर ३-०-२६-२, सुशांत मिश्रा २.२-०-२१-२, रवींद्र जाडेजा ३-०-२१-२).









