‘वृक्षछाटणी शुल्क रद्द करा’

महाराष्ट्र टाइम्स

नवी मुंबईत गृहनिर्माण संस्थांमधील झाडांच्या छाटणीसाठी आकारले जाणारे शुल्क रद्द करण्याची मागणी होत आहे. नगरसेवक सुनील कुरकुटे यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे. पावसाळ्यात धोकादायक फांद्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे हे शुल्क रद्द करून मोफत सेवा द्यावी. तसेच, पावसाळ्यापूर्वी वृक्ष तपासणी व छाटणी मोहीम राबवावी.

‘वृक्षछाटणी शुल्क रद्द करा’
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गृहनिर्माण संस्थांमध्ये झाडांच्या छाटणीसाठी आकारण्यात येणारे प्रति झाड २००रुपये एनओसी शुल्क तात्काळ रद्द करावे. नागरिकांना मोफत वृक्ष छाटणी सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रभाग क्र. १९ सानपाडा येथील नगरसेवक सुनील कुरकुटे यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांकडे एक निवेदन दिले आहे. यात त्यांनी म्हटले आले आहे की, नवी मुंबईतील अनेक गृहनिर्माण संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्ष असून पावसाळ्याच्या काळात वाढलेल्या फांद्यांमुळे खाली कोसळतात. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. अनेक वेळा फांद्या पडून अपघात, वीज वाहिन्यांचे नुकसान, वाहतूक अडथळे तसेच नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याच्या घटना घडतात. त्यामुळे वेळेवर झाडांची छाटणी होणे गरजेचे आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत झाडांच्या छाटणीसाठी प्रति झाड २०० रुपये प्रमाणे एनओसी शुल्क आकारले जात आहे. हा वृक्ष छाटणीचा खर्च मात्र संबंधित गृहनिर्माण संस्थांकडून केला जातो. त्यामुळे हे शुल्क म्हणजे नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार असून सामान्य नागरिकांची अप्रत्यक्ष लूट आहे. परिणामी महानगरपालिकेमार्फत मोफत झाड छाटणी सेवा सुरू करावी, पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक वृक्ष तपासणी व छाटणी मोहीम राबवावी, नागरिकांसाठी सुलभ तक्रार नोंदणी व हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करावी, असे निवेदनात नगरसेवक सुनील कुरकुरे यांनी म्हटले आहे. नवी मुंबईतील नागरिक नियमितपणे मालमत्ता कर तसेच विविध महानगरपालिका कर भरत असताना सार्वजनिक सुरक्षेशी संबंधित मूलभूत सेवांसाठी स्वतंत्र शुल्क आकारणे अन्यायकारक आहे, असे निवेदनात म्हटले आहे.