भीती न आम्हा तुमची मुळीही...

महाराष्ट्र टाइम्स

गोखले रस्त्यावरील पथारी व्यावसायिकांवर पालिकेने नियंत्रण मिळवले आहे. मात्र, इमारतींचे पार्किंग आणि मार्जिनमधील अनधिकृत व्यवसाय अजूनही सुरू आहेत. आयुक्तांनी केलेल्या घोषणा हवेत विरल्या आहेत. लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अतिक्रमणांवर कारवाईचा फार्स सुरू आहे.

encroachment crisis on gokhale road promises of municipal corporation and awaited actions

शहरातील अत्यंत वर्दळीच्या नामदार गोखले रस्त्यावरील (एफसी रस्ता) अनधिकृत पथारी व्यावसायिकांवर पालिकेने काही प्रमाणात नियंत्रण मिळवले आहे. मात्र, इमारतींचे पार्किंग, फ्रंट व साइड मार्जिनमधील अनधिकृत व्यवसाय बिनदिक्कत सुरू आहेत. त्यामुळे सर्व प्रकारच्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे पोलिस आयुक्त व महापालिका आयुक्तांचे आश्वासन हवेत विरले आहे.

महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन आणि बांधकाम विभाग, क्षेत्रीय कार्यालयांमार्फत संयुक्तपणे ही कारवाई केली जाते. अनेकदा कारवाई होण्यापूर्वीच ‘अर्थपूर्ण’ संबंधांतून त्याची खबर संबंधित व्यावसायिकांपर्यंत पोहोचवली जाते. त्यामुळे कारवाईपूर्वीच अतिक्रमण काढले जाते. कारवाईनंतर काही वेळांतच सर्व अतिक्रमणे पूर्ववतही होतात. त्यामुळे ही कारवाई म्हणजे निव्वळ ‘फार्स’ ठरतो. अतिक्रमणविरोधी स्थिर व गस्ती पथकांची वाहने रस्त्यावर असली, तरी अधिकारी कर्मचारीच पथारी व अन्य अतिक्रमण करणाऱ्यांशी ‘सुसंवाद’ साधताना दिसतात.

गेल्या काही दिवसांत गोखले रस्त्यावरील अनधिकृत पथारी व्यावसायिक थोडे कमी झाले आहेत. मात्र, या रस्त्याला जंगली महाराज रस्त्याशी जोडणारे उपरस्ते आणि या रस्त्यावरील इमारतींचे पार्किंग व साइड व फ्रंट मार्जिनमध्ये अनधिकृत व्यवसाय सुरू आहेत.

आयुक्तांची घोषणा हवेतच?

अकरा मार्च २०२६ रोजी महापालिका आयुक्त नवलकिशोर राम आणि पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी फ्लेक्समुक्ती मोहिमेसह, अतिक्रमण व मान्सूनपूर्व कामांबाबत बैठक घेतली. त्यानंतर पोलिस आयुक्तालयात एकत्रित पत्रकार परिषदेत, ‘पदपथ अडवून व इमारतींचे पार्किंग, फ्रंट व साइड मार्जिनमध्ये अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांची ठिकाणे शोधण्यात आली आहेत. प्रायोगिक तत्त्वावर गोखले रस्ता व काही खासगी ठिकाणी कारवाई केली जाईल. तिथे पुन्हा अनधिकृत व्यवसाय चालणार नाहीत, अशी कारवाई करू. पार्किंगच्या जागेत व्यवसाय, गोदाम व अन्य व्यवसाय विनापरवानगी करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. लवकरच फर्ग्युसन रस्त्यासह इतर ठिकाणचे चित्र बदललेले दिसेल,’ असा दावा पालिका व पोलिस आयुक्तांनी केला होता. पदपथावरील पथारीवाले हटले तरी साइड, फ्रंट मार्जिन व पार्किंगमधील व्यवसाय सुरूच आहेत.

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षच

सर्वसामान्यांना अतिक्रमणांचा त्रास सहन करावा लागतो. नागरिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना पदपथावरील अतिक्रमणे दिसत नाहीत का, असा सवाल नागरिक करीत आहेत.