मूळचे दापोली येथील असलेले महाराष्ट्रातील प्रतिभावान मराठी गझलकार पं. खावर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा पहिला ' पं. खावर काव्यपुरस्कार ' दापोलीतील ज्येष्ठ साहित्यिक इक्बाल मुकादम यांना प्रदान करण्यात आला. दापोलीतील पद्मश्रद्धा सभागृहात आयोजित रंगबहार कवीसंमेलनात हा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला. दापोली येथील जागरण सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला
ज्येष्ठ कवी केशवसुत यांच्या दापोलीतील निवासस्थानी तसेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या मुरुड गावात कविसंमेलनाचे आयोजन केले होते. नवोदित आणि प्रतिभावान कवींना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या 'रंगबहार' कविसंमेलनाला काव्यरसिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. दापोलीतील साहित्यिक इक्बाल मुकादम यांना दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष जयवंत जालगावकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी नगरसेविका रिया सावंत, माजी नगरसेवक सचिन गायकवाड उद्योजक अक्षय फाटक, जागरण संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. कविसंमेलनात कैलास गांधी, सुदेश मालवणकर, सुनील कदम, स्नेहा घाडीगांवकर, रेखा जगरकल, प्रतिक्षा नगरकर,बाबू घाडीगांवकर, सचिन चव्हाण, सुशांत रिसबूड, सुनीता मोदी या कवींनी स्वरचित कविता व गझल सादर केल्या.






