पुणे : ‘आमच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले आहे,’....पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होते. तपास सुरू होताच एक-दोन दिवसांतच मुलगी काही ठरावीक ठिकाणी एका तरुणाबरोबर सापडते. आपल्यावर बलात्कार झाल्याची तक्रार तरुणी करते. ती अल्पवयीन असल्याने बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पोक्सो) गुन्हा दाखल होतो. पाठोपाठ आरोपी तरुणाकडे खंडणी मागितली जाते. ही कुठल्या एका गुन्ह्यातील कार्यपद्धती नसून, या स्वरूपाच्या सहा महिन्यांत २६ तक्रारी शिक्रापूर परिसरात नोंदवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या तक्रारी खऱ्या, की संघटित कारस्थान अशी शंका उपस्थित केली जात आहे.
या खटल्यांबाबत संशय येण्याजोग्या अन्य काही बाबी म्हणजे या मुली ठरावीक भागांतच सापडतात. एकापेक्षा अधिक प्रकरणांमध्ये एकच मुलगी तक्रारदार असणे असे कल पोलिसांना तपासात दिसले आहेत. त्यामुळे अशा तक्रारींच्या खरेपणाबाबत संशय आहे.
या प्रकरणी शिक्रापूर ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी अल्पवयीन मुली हरवल्याची प्रकरणे वाढली नसल्याचे सांगितले. बंदोबस्तात असल्याने अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला.






