अलिबाग येथील सुप्रसिद्ध ‘आसरा’ हॉटेलचे मालक ज्येष्ठ व्यावसायिक नित्यानंद माधव कामत (७२) यांचे रविवारी पुणे येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले आणि दोन विवाहित भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने अलिबागसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
नित्यानंद कामत हे अलिबागमधील आसरा हॉटेलचे संस्थापक माधवशेठ कामत यांचे सुपुत्र होते. अलिबागच्या पर्यटन क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. काळाची गरज ओळखत त्यांनी अलिबागमध्ये ‘मीरामाधव’ हे पहिले टू-स्टार हॉटेल उभारले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे अलिबागच्या पर्यटन व्यवसायाला नवी ओळख मिळाली. क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग होता.






