येरवडा कारागृहात कैद्याला मारहाण

महाराष्ट्र टाइम्स

येरवडा कारागृहात तंबाखूवरून झालेल्या वादातून दोन कैद्यांनी एका कैद्याला लाकडी पट्टी आणि बादलीने मारहाण केली. या हल्ल्यात कैदी जखमी झाला. वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अजय राठोड आणि संतोष भालेराव यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. घटनेनंतर जखमी कैद्याला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. येरवडा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

shocking incident of assault on inmate in yerwada jail

येरवडा मध्यवर्ती कारागृहात तंबाखूच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून दोन कैद्यांनी एका कैद्याला लाकडी पट्टी आणि प्लास्टिकच्या बादलीने मारहाण करून जखमी केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जखमी कैद्याचे नाव शुभम पंढरीनाथ पोखरकर असे असून, याबाबत वरिष्ठ तुरुंग अधिकारी रेवनाथ कडू कानडे (वय ५७) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अजय शंकर राठोड आणि संतोष सुरेश भालेराव या दोघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २७ मे रोजी सकाळी सात वाजून ५५ मिनिटांच्या सुमारास येरवडा कारागृहातील सर्कल क्रमांक दोनमधील सार्वजनिक शौचालयाजवळील पाण्याच्या हौद परिसरात घडली. त्या वेळी शुभम पोखरकर पाण्याच्या टाकीजवळ उभा होता. अजय राठोड याने तंबाखूच्या कारणावरून त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.

वाद वाढल्यानंतर अजय राठोड याने जेवण वाटपासाठी वापरण्यात येणाऱ्या मापट्याच्या लाकडी पट्टीने पोखरकर यांच्या डोक्यात मारहाण केली. त्यानंतर संतोष भालेराव याने प्लास्टिकची बादली डोक्यात मारून त्याला जखमी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेनंतर पोखरकर याला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. या प्रकरणी येरवडा पोलिस पुढील तपास करीत आहेत.