महापालिकेविरोधात आंदोलन करणार

महाराष्ट्र टाइम्स

शहरातील वाढती अस्वच्छता, तुंबलेले नाले आणि मोकाट कुत्र्यांचा वाढता धोका यामुळे नागरिक त्रस्त आहेत. काँग्रेस पक्षाने याविरोधात महापालिकेवर आंदोलन पुकारले आहे. नाल्यांची तातडीने साफसफाई, विशेष स्वच्छता मोहीम आणि मोकाट कुत्र्यांना पकडण्यासाठी पथक नेमण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागण्या पूर्ण न झाल्यास मोठे लोकआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

महापालिकेविरोधात आंदोलन करणार
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

शहरातील वाढती अस्वच्छता, तुंबलेले नाले आणि मोकाट कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिकांचे जगणे असुरक्षित झाले असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी महापालिकेविरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याचे पक्षाचे शहराध्यक्ष डॉ. विशाल धानुरे यांनी सांगितले आहे. या संदर्भात महापालिका आयुक्तांना त्यांनी निवेदन दिले आहे.

‘संग्रामनगर, कन्हैयानगर, लालबाग, इंडियननगर, नॅशनलनगर, चंदनझिरा, साठेनगर, जुना जालना भागात नाल्यांमध्ये गाळ, कचरा आणि सांडपाणी साचल्याने दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. नालेसफाईकडे दुर्लक्ष झाल्याने डेंग्यू, मलेरिया आणि इतर साथीच्या रोगांचा धोका आहे. मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत असून, नुकताच एका पिसाळलेल्या कुत्र्याने जुना जालना भागात धुमाकूळ घालत लहान मुलांसह आठ नागरिकांना चावा घेतल्याची घटना घडली. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिला, शाळकरी मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून जावे लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया परिसरातून उमटत आहे,’ असे या निवेदनात म्हटले आहे.

‘कराच्या नावाखाली लाखो रुपये वसूल करणारी महानगरपालिका मूलभूत सुविधा देण्यात अपयशी ठरली आहे. शहरातील स्वच्छता कोलमडली सर्व नाले तातडीने साफ करणे, विशेष स्वच्छता मोहीम राबवणे, मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांना पकडण्यासाठी विशेष पथक नेमणे, कायमस्वरूपी डॉगहाउस सुरू करणे, नागरिकांना मोफत उपचार व लसीकरण उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली आहे. याप्रश्नी काँग्रेसच्या वतीने लोकआंदोलन छेडले जाईल,’ असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

या वेळी नगरसेवक अमजद पठाण, असिफ अन्सारी, दिनेश सुराणा, रघुवीर गुडे, सुरज येलगंटीवार, चंद्रकांत रत्नपारखे, नाना शेवाळे, दिग्विजय दांडगे, वसीम कादरी, भरत लोढा, अंकुश शिंदे उपस्थित होते.