राज्यातील १७ जागांसाठी होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे १७ पैकी १५ जागांवर एकमत झाले असून दोन जागांवरही लवकरच निर्णय होईल. काँग्रेस पक्ष चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव-लातूर-बीड या जागा लढवणार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्ष पुणे, ठाणे व सांगली-सातारा या ३ जागा आणि शिवसेना (उबाठा) रायगड, जळगाव, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर या ४ जागा लढवत आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.
विधान परिषदेच्या जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (श.प.) कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना (उबाठा) नेते खासदार अनिल देसाई, आमदार अंबादास दानवे, आमदार मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अदिती नलावडे उपस्थित होते.
सपकाळ पुढे म्हणाले की, विधान परिषदेच्या निवडणुकीतही सत्ताधारी पक्षाकडून पैशाचा वापर मोठ्या प्रामणावर सुरु आहे. विरोधकांचे नगरसेवक पळवले जात आहेत, ५-५ लाख रुपये ॲडव्हान्स दिले आहेत. लोकशाहीचा उत्सव असलेल्या निवडणुकीचा भाजपा महायुतीने घोडेबाजार बनवला आहे. भाजपा महायुतीच्या दंडेलशाहीविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उभे आहोत.
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने वरिष्ठ नेत्यांच्या निरीक्षक म्हणून नियुक्त्या केल्या आहेत. सोलापूरसाठी खासदार प्रणिती शिंदे, सांगली-सातारासाठी माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, पुणेसाठी सतेज ऊर्फ बंटी पाटील, अहिल्यानगरसाठी बाळासाहेब थोरात, जळगावसाठी खासदार चंद्रकांत हंडोरे, नाशिकसाठी माजी मंत्री के. सी. पाडवी, नांदेडसाठी खासदार रवींद्र चव्हाण, धाराशिव-लातूर-बीडसाठी आमदार अमित देशमुख, परभणी हिंगोलीसाठी खासदार डॉ. कल्याण काळे, छत्रपती संभाजीनगर-जालनासाठी माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, यवतमाळसाठी माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, भंडारा-गोंदियासाठी नाना पटोले, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीसाठी विजय वडेट्टीवार, अमरावतीसाठी यशोमती ठाकूर, नागपूर पोटनिवडणुकीसाठी डॉ. नितीन राऊत, ठाणे मतदार संघासाठी माजी मंत्री नसिम खान, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी मुझफ्फर हुसेन यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे.









