तिसऱ्या जागेसाठी राष्ट्रवादी आग्रही?

महाराष्ट्र टाइम्स

राष्ट्रवादी काँग्रेस आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी आक्रमक झाली आहे. परभणीची जागा लढवण्यासाठी पक्षाचे नेते आग्रही आहेत. पुणे आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जागांवरही पक्षाचा दावा आहे. पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत यावर चर्चा झाली. सुनेत्रा पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. पक्षातील रस्सीखेच निवडणुकीच्या निकालावर परिणाम करू शकते.

तिसऱ्या जागेसाठी राष्ट्रवादी आग्रही?
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

आगामी विधान परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने परभणीची जागाही लढवावी, अशी आग्रही भूमिका नेत्यांनी शुक्रवारी मांडली. पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या शासकीय निवसासस्थानी पार पडली. यात पुणे आणि रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जागांबरोबरच परभणीची जागाही लढवावी, अशी आग्रही भूमिका मांडण्यात आली.

राष्ट्रवादीमध्ये विधान परिषद निवडणुकीसाठी रस्सीखेच असल्याचे दिसून येत आहे. पक्षाकडून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागेसाठी २०२५मध्ये निवृत्त झालेले अनिकेत तटकरे हे पुन्हा इच्छुक आहेत. परंतु, एकाच घरात आणखी एक पद देण्याबाबत काही नेत्यांचा आक्षेप आहे. या जागेसाठी पक्षातील इतर नेत्याचा विचार व्हावा, असा विचार मांडला गेला. तर दुसरीकडे पुण्याच्या जागेसाठी अनेकांनी आपला दावा केला आहे. त्यातच शुक्रवारी झालेल्या बैठकीत परभणीच्या जागेबाबत राष्ट्रवादीने आग्रही राहावे, अशी भूमिका नेत्यांनी मांडली. परभणीतील स्थानिक स्वराज्य संस्थांचे बळ पाहता त्या जागेवरही दावा सांगावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. बैठकीला पक्षाच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार, कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, पार्थ पवार आदी नेते उपस्थित होते.