तालुक्यातील सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील देवगाव रंगारी-गल्ले बोरगाव चौफुली येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे काम रखडले असून, गेल्या दोन-तीन वर्षांपासून रखडलेल्या या अर्धवट कामामुळे; तसेच रस्त्यावरील खड्डे व चुकीच्या वळणामुळे येथे भीषण अपघात होत आहेत. आतापर्यंत या ठिकाणी दहा जणांचा मृत्यू झाला असून, २६पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी झाले आहेत. यात आजवर १०७ लोक किरकोळ जखमी झालेले आहेत.
चौफुलीवरील पथदिवेदेखील दोन वर्षांपासून बंद असून, रात्रीच्या वेळी या ठिकाणी अंधार पसरलेला असतो. वाहनचालकांना या ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्याचे कामामुळे येथील रस्ता लक्षात येत नाही. उड्डाणपुलाचे काम बंद असल्यामुळे धूळ, वाहतुकीच्या कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.
शालेय विद्यार्थी, शेतकरी, व्यापाऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
रात्रीच्या वेळी अंधारात खड्डे आणि अर्धवट बांधकामामुळे वाहनांचा ताबा सुटून या ठिकाणी अपघात होत असतात. प्रशासनाने तत्काळ उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून या ठिकाणी बंद असलेले पथदिवे सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.









