95 Rain Deficit In October Water Scarcity Increases In The State
ऑक्टोबरमध्ये पावसाचा ९५ टक्के तुटवडा
Contributed by: मुंबई,म. टा. विशेष प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
पावसाळ्याचा शेवटचा टप्पा कोरडा गेल्याने राज्यातील पाणीटंचाई आणि शेतीची चिंता वाढली आहे. ऑक्टोबर महिन्यात राज्यात सरासरीच्या तुलनेत ९५ टक्के कमी पाऊस झाला. विशेष म्हणजे, १२ जिल्ह्यांमध्ये संपूर्ण महिनाभर पावसाची नोंदच झाली नाही. पावसाळा संपताच उन्हाचा चटका आणि उकाडा वाढू लागल्याने नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.
भारतीय हवामान विभागाच्या ऑक्टोबर २०२६च्या मासिक पर्जन्यमान अहवालानुसार, राज्यात या महिन्यात सरासरी ७४ मिलिमीटर पाऊस अपेक्षित होता. मात्र, प्रत्यक्षात अवघा ३.६ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला. त्यामुळे राज्यातील पावसाची तूट ९५ टक्क्यांवर पोहोचली आहे.विभागनिहाय पाहता, मराठवाड्यात ऑक्टोबरमध्ये एकही मिलिमीटर पावसाची नोंद झाली नाही. मध्य महाराष्ट्रात सरासरी ७७.९ मिलिमीटरच्या तुलनेत ४.१ मिलिमीटर पाऊस झाला असून, ९५ टक्के तूट नोंदली गेली. विदर्भात ५७.८ मिलिमीटरऐवजी २.२ मिलिमीटर पाऊस झाला; येथे तूट ९६ टक्के आहे. कोकण-गोवा विभागात ११६.४ मिलिमीटरच्या तुलनेत १९.१ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला असून, ८४ टक्के तूट आहे.
जिल्हानिहाय आकडेवारीनुसार, मुंबई शहर, धुळे, जळगाव, नंदुरबार, सोलापूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली, जालना, लातूर आणि परभणी या १२ जिल्ह्यांत ऑक्टोबरमध्ये शून्य पाऊस झाला. या सर्व जिल्ह्यांत १०० टक्के पावसाची तूट नोंदली गेली. नांदेड व बुलढाणा येथे प्रत्येकी ०.२ मिलिमीटर, अकोल्यात ०.४ मिलिमीटर, वाशिममध्ये ०.५ मिलिमीटर आणि वर्ध्यात ०.८ मिलिमीटर पाऊस झाला.