राठी रंगभूमीवरील विविध प्रवाहांत एक प्रवाह पौराणिक नाटकांचा आहे. अलीकडे पुन्हा नव्या-जुन्या मंडळींना पौराणिक कथा-लोककथा आधुनिक शैलीत सादर कराव्याशा वाटू लागल्या आहेत. एकांकिका स्पर्धांमधूनही अशा भक्तांच्या कथा, त्यातील नातेसंबंध व नवीन पैलू मांडले गेले. भरत नाट्य संशोधन मंदिर या पुण्याच्या नामांकित नाट्यसंस्थेने आजवर असंख्य संगीत नाटक ांची निर्मिती केली आहे. त्यांचे नवे संगीत नाटक ‘ सं. पद्माराणी ’ म्हणजे विठ्ठल-रखुमाईसंदर्भातील एका लोककथेला दिलेले आधुनिक रूप. लेखक रमेश काशिनाथ नाईक यांनी माळशिरस परिसरातील एका लोककथेवर संगीत नाटक लिहिले. त्याची रंगावृत्ती व दिग्दर्शन संजय नरहर डोळे यांनी केले आहे. या नाटकास महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेत अकरा पारितोषिके मिळाली आहेत. या नाटकाच्या सादरीकरणात आधुनिकता आणली आहे. आधुनिक ढंगात सादर झालेली ही लोककथा तिच्या मंत्र-तंत्रामुळे नवे काही पाहू इच्छिणाऱ्या संगीत नाट्यप्रेमींना नक्कीच आवडेल.
वेगळे कथानक अनुभवायला मिळणार, असे संकेत प्रारंभीच्या नांदीतून मिळतात. सकाळच्या प्रहरी येणाऱ्या वासुदेवाकडून आपल्याला कथासूत्र सांगितले जाते. मल्हारी राजाचे राज्य आहे आणि विठू त्याची माळशिरसचा कारभारी म्हणून चाकरी करतो आहे. पदूबाई त्याची अस्तुरी आहे. खुद्द पद्माराणी, म्हणजेच पदूबाई वासुदेवाशी हितगुज करते, त्याला शिधा देते. आपल्याला गावातील सकाळच्या प्रहराचे प्रसन्न दर्शन घडते. आधुनिक एलईडी स्क्रीनचा वापर करीत, मागे घटनास्थळ दाखवण्याची व्यवस्था नेत्रसुखद व तपशीलवार जाणवते. वासुदेव व पदूबाई यांनी गायलेल्या पदांमधून कथेबाबत काही सूचन केले जाते. (उदा. पदूबाई म्हणते - ‘प्रेम भक्तीचे रण’, तर वासुदेव कवतिक करतो - ‘माय माजी शाणी, विठूची पद्मावती राणी.’) प्रधानजी सोमनाथच्या हाती पदूबाई आपल्या धन्यासाठी न्याहारी देते; पण विठूराया ती आपल्या भक्तांनाच देणार व स्वत: उपाशी राहणार, याची तिला कल्पना असते.लेखनात पात्रपरिचय व मुख्य विषयाला लगेच हात घातल्याने नाटक सुरुवातीपासून पकड घेऊ लागते. कचेरीत बसून प्रजेच्या समस्यांचे निराकरण करणारा विठ्ठल आपल्याला दिसतो. (नेपथ्यबदलही लक्षवेधक, प्रायोगिक ढंगाने तराफ्यांचा वापर.) खान्देशातून आपला परमभक्त माळीराया पाचशे भक्तांसह येतो आहे, हे समजल्यावर, पाचशे माणसांची व्यवस्था करण्याचा निरोप विठ्ठल सोमनाथामार्फत पदूबाईला धाडतो. तो निरोप म्हणजेच पती-पत्नीमध्ये होणाऱ्या मतभेदाचे बीज. पुढे त्यातूनच संपूर्ण नाट्य घडते. या लोककथेचा संदर्भ विदुषी दुर्गा भागवत यांच्या ‘पैस’मध्येही आढळतो. विठ्ठल आणि रखुमाई यांची मंदिरे वेगवेगळी का? एकत्र का नाहीत? या प्रश्नाचा उलगडा होतो.
दिग्दर्शक संजय नरहर डोळे यांनी रंगावृत्ती करताना, या लोककथेला केवळ आधुनिक बाह्यरूप दिलेले नाही, तर पती-पत्नी नातेसंबंधाला समकालीनतेचा आधुनिक पदर जोडला आहे. परिणामी दोघांमधील नाते अधिक वास्तव वाटते; त्यामुळे त्यांच्यातील संघर्षाला एक प्रकारचा व्यावहारिक टोकदारपणाही येतो. दृश्यबदल, प्रसंगांच्या साखळीतून अपेक्षित परिणाम साधणे यांमुळे नाटक ‘आजचे’ वाटते. पत्नीला शाप देणे, अस्थी जपून ठेवणे त्यातून चमत्कार घडून सुखात्म शेवट होतो.
कथेचा जीव छोटा आहे; पण नाट्यपदे, भावनिक प्रसंगाद्वारे ‘नाट्य’ खुलवले आहे. सुरुवातीला गावात येणारा वासुदेव म्हणून अजिंक्य कुलकर्णी शोभतात. ‘माय माय माजी शाणी’ आदी पदांतून प्रेक्षकांना रिझवतात. अप्रत्यक्षपणे सूत्रधार म्हणून नाटक पुढे नेण्याचे काम करतात. पदूबाई-पद्मा राणीची भूमिका करणाऱ्या ऐश्वर्या भोळे या कलावतीने व्यक्तिरेखेचे अधिकाधिक कंगोरे आपल्या गान-अभिनय गुणांनी फुलवले आहेत. पत्नी म्हणून सात्विक संताप व शापावस्थेमध्ये होणारी परवड, पश्चाताप नैसर्गिक वाटतो. विठूरायाची भूमिका विश्वास पांगारकर यांनी समजून केली आहे. विशेषत: पती म्हणून पश्चातापदग्ध होणे, लेकीचे दु:ख सावरण्याबाबत अपयशी ठरणे यांत त्याचा प्रत्यय येतो. विठ्ठल-भक्त यांच्यातील पती-पत्नी नाते संपुष्टात येते, हा वेगळा पदर आहे. ‘विठ्ठल तेथे पद्मावती’ आणि त्याच्या आयुष्यातील अस्तुरीचे महत्त्व अधोरेखित होते. पुढे संसार तुटला म्हणून दोघे स्वतंत्र राहतात.
संगीत नाटकातील काळानुरूप आशयघनता प्रेक्षकांना निश्चितच आवडेल, अशी आहे. सोमनाथ प्रधानजी म्हणून कौशिक कुलकर्णी शोभतात. माळीराया म्हणून वज्रांग आफळे शोभतात आणि गायनसुद्धा रंगते. खुद्द देवाच्या सुखासाठी याचना करणारा हा भक्त विरळाच. विठ्ठल-पदूबाईची कन्या ‘भागीरथी’ म्हणून वृंदा पांगारकर शोभतात. त्यांची गान-तयारी यथार्थ आहे; पण मुळातच या व्यक्तिरेखेला वाव मर्यादित आहे. त्याचप्रमाणे मावशी, सखूबाई, सोयराबाई अशा व्यक्तिरेखांच्या मार्फत जणू कौटुंबिक बाजू उभी केली जाते. इतर पात्रांमधून गावचे वातावरण, देव-भक्त नाते टिपले जाते.
विश्वास पांगारकरांचे नेपथ्य आधुनिकतेशी नाते जोडते; त्यामुळे प्रसंगातील भावछटांना अनुरूप दृश्यसाथ मिळते. प्रायोगिक पद्धतीने तराफ्यांचा वापर अपेक्षित नाट्यपूर्ण परिणाम साधणारा झाला आहे. हे आजचे संगीत नाटक असल्याचे जाणवते. गीते, संगीत आणि गायक कलावंतांमुळे नाट्यपदांची बाजू ताकदीची झालेली आहे. चालीतील गेयता, अर्थपूर्ण शब्दरचनायुक्त भावमधुर पदांचा आस्वाद संगीतप्रेमी प्रेक्षकांना घेता येतो. संगीताची बाजू ऑर्गन - स्वानंद नेणे, तबला - सिद्धार्थ कुंभोजकर, पखवाज - मनोज भांडवलकर, तालवाद्य - मनोहर अत्रे यांनी तितक्याच तोलामोलाने सांभाळली आहे. प्रयोगात किंचित आटोपशीरपणा आणला, तर संगीत व लोककथेतील नाट्याची गोडी अधिक रंगतदार होऊ शकेल.
अशा तऱ्हेने आपल्या साहित्यातील कथा, आख्यायिका, दंतकथा यांवर आधारित, आजच्या प्रेक्षकांसाठी आगळेवेगळे संगीत नाटक देण्याचा प्रयत्न कौतुकाचा आहे. अशी निर्मिती ही व्यावसायिक प्रयोगातून बहुसंख्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला हवी. ‘देवबाभळी’ हे स्पर्धेतून मुख्य प्रवाहात दाखल होऊन लोकमान्य झालेले ताजे उदाहरण आहे. ‘संगीत पद्माराणी’ या नाटकाची निर्मिती करणारी ‘भरत नाट्य संशोधन मंदिर, पुणे’ या प्रतिष्ठीत संस्थेने एलईडी तंत्र वापरून एखाद्या व्यावसायिक नाटकाप्रमाणे केली आहे. आजच्या व्यावसायिक रंगभूमीवर काही निर्माते एकत्र येऊन संयुक्त निर्मिती, सादरीकरण करतात. या पद्धतीने नाट्यसंस्थेने स्पर्धेत घवघवीत यश मिळालेल्या या नाटकाचे व्यावसायिक स्तरावर प्रयोग करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत; तरच लोककथेचे केलेले सांगीतिक आधुनिकीकरण अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत जाऊ शकेल. अनेक दशके मोहिनी घालणाऱ्या जुन्या संगीत नाटकांचा मौल्यवान ठेवा जसा जपायला हवा; तसेच आजच्या तरुणाईने केलेले काळानुरूप सांगीतिक प्रयोगही रुजायला आणि टिकायला हवेत.