Chief Ministers Mental Balance Disturbed Congress Criticism On Rahul Gandhis Rally
मुख्यमंत्र्यांचे मानसिक संतुलन बिघडले
Contributed by: म. टा. खास प्रतिनिधी,मुंबई|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
दिल्लीतील रामलीला मैदानावर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित ‘व्होट बचाओ, देश बचाओ’ महारॅलीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
‘महारॅलीला मिळालेला प्रतिसाद आणि मतचोरीविरोधातील आंदोलनामुळे फडणवीस यांचे मानसिक संतुलन बिघडले असून, ते बेछूट आरोप करीत आहेत,’ असा पलटवार सपकाळ यांनी केला. राज्यातील अडीच कोटी मृत मतदारांची नावे मतदारयादीच्या विशेष सखोल पडताळणीच्या (एसआयआर) प्रक्रियेतून वगळल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा खोटा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.समाजमाध्यमावरील पोस्टमधून सपकाळ यांनी फडणवीस यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. काँग्रेसने एकही बूथस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) नियुक्त केला नसल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा धादांत खोटा असल्याचे सांगून काँग्रेसचे ५६ हजार बीएलए कार्यरत असल्याचा दावा त्यांनी केला. ‘मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाकडून अधिकृत माहिती घेतली असती, तर वस्तुस्थिती समजली असती,’ असेही सपकाळ यांनी म्हटले आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत साबरमतीच्या काठावर झोके घेतले, तेव्हा चीनकडून त्यांना निधी मिळाला होता का,’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला.