होण्याचे आवाहनकेंद्र सरकारच्या पेन्शनरविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी आणि प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील ईपीएस ९५ पेन्शनर्स गुरुवारी (दि. ५) सकाळी ११ वाजता नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून ‘काळी दीपावली’ साजरी करणार आहेत, अशी माहिती नाशिक जिल्हा ईपीएफ पेन्शनर्स फेडरेशनच्या बैठकीत देण्यात आली.
आयटक कामगार केंद्र, नाशिक येथे फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष व आयटक राज्य सचिव राजू देसले यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी राज्य नेते डी. बी. जोशी यांनी देशपातळीवरील पेन्शनर्सचा लढा आणि केंद्र सरकारसोबत झालेल्या बैठकीतील माहिती पेन्शनधारकांना दिली. बैठकीत वक्त्यांनी संताप व्यक्त करताना सांगितले की, केंद्र सरकार पेन्शनधारकांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे. सन २००३ मध्ये दिलेले आश्वासन अद्याप पाळलेले नाही. आज बहुतांश पेन्शनर्सना दरमहा एक हजार रुपयांपेक्षाही कमी पेन्शन मिळते, तर ७० टक्के पेन्शनधारकांना एक ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान पेन्शन मिळते. वाढत्या महागाईत आणि आजारपणाच्या खर्चात एवढ्या अल्प रक्कमेत जगणे अशक्य झाले आहे. औषधांनाही पैसे पुरत नसल्याने येणारी दीपावली कशी साजरी करायची, असा प्रश्न पेन्शनधारकांसमोर उभा राहिला आहे. गेल्या दीड वर्षापासून पी. एफ. कार्यालय आणि एस. टी. प्रशासन यांच्यातील वादामुळे सेवानिवृत्त एस. टी. कामगारांचे पेन्शन फॉर्म स्वीकारले जात नाहीत. या अन्यायाचा तीव्र निषेध या आंदोलनात केला जाणार असून, आगामी काळातील तीव्र लढ्याची दिशाही या वेळी जाहीर केली जाईल.
आंदोलनात सहभागी
होण्याचे आवाहन
या धरणे आंदोलनात औद्योगिक कामगार, एस. टी. कर्मचारी, साखर कामगार, एच. ए. एल., सहकारी बँक कर्मचारी, विकास संस्था सचिव, वीज कामगार, विडी कामगार, एफ. सी. आय. व सेवानिवृत्त पत्रकारांसह सर्व ईपीएस पेन्शनर्सनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नाशिक जिल्हा पेन्शनर्स फेडरेशनचे कार्याध्यक्ष नामदेव बोराडे, शिवाजी ढोबळे, रमेश खापरे, उत्तम आढाव, पांडुरंग सूर्यवंशी, सुभाष चव्हाण, काशिनाथ बागूल, अरुण चव्हाण, सोमनाथ जाधव, रामचंद्र टिळे, अशोक जाधव आणि व्ही. एम. राठोड आदींनी केले आहे.