Impact Of Creator Economy On India And Job Opportunities
‘क्रिएटर’ची अर्थव्यवस्थेत भर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
बाइलवर व्हिडिओ तयार करून ‘यू-ट्यूब’वर प्रसिद्ध करणाऱ्या तरुणाभोवती आज रोजगाराची नवी दुनिया उभी राहत आहे. सुरुवातीला स्वतःच चित्रीकरण, लेखन, संपादन आणि प्रसार करणारा क्रिएटर लोकप्रिय झाल्यानंतर संपादक, लेखक, कॅमेरा ऑपरेटर, तंत्रज्ञ आणि मार्केटिंग तज्ज्ञांची टीम तयार करतो. या क्रिएटर अर्थव्यवस्थेने २०२५मध्ये भारताच्या ‘जीडीपी’त १८ हजार कोटी रुपयांहून अधिक भर घातली असून, ९.६ लाखांहून अधिक पूर्णवेळ रोजगारांना आधार दिला आहे. स्थानिक भाषांतील कंटेंटला जागतिक प्रेक्षक मिळत असताना, मुलांच्या ऑनलाइन सुरक्षिततेचे आव्हानही कायम आहे.
क्रिएटर अर्थव्यवस्थेचा भारताला किती मोठा आर्थिक फायदा झाला?‘यू-ट्यूब’च्या २०२५च्या अहवालानुसार, ‘यू-ट्यूब’भोवती तयार झालेल्या क्रिएटिव्ह इकोसिस्टीमने भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात १८ हजार कोटी रुपयांहून अधिकची भर घातली. या क्षेत्रामुळे ९.६ लाखांहून अधिक पूर्णवेळ समकक्ष रोजगार मिळाले. सन २०२४मध्ये या अर्थव्यवस्थेचे ‘जीडीपी’तील योगदान १६ हजार कोटी रुपयांहून अधिक होते आणि ९.३ लाखांहून अधिक रोजगार निर्माण झाले होते. या आकडेवारीवरून क्रिएटर अर्थव्यवस्था केवळ मनोरंजनाचे माध्यम न राहता रोजगार आणि व्यवसायाचे महत्त्वाचे क्षेत्र बनत असल्याचे स्पष्ट होते.
क्रिएटरची संख्या आणि कमाईचे मार्ग कसे वाढले?
‘इंडियन स्कूल ऑफ बिझनेस आणि हॅशफेम’च्या २०२६च्या अहवालानुसार, भारतातील क्रिएटरची संख्या २०२०मधील ९.६ लाखांवरून २०२५मध्ये ४१.२ लाखांवर पोहोचली; म्हणजेच पाच वर्षांत या समुदायाची चौपटीहून अधिक वाढ झाली. ब्रँड आता केवळ फॉलोअरची संख्या न पाहता प्रेक्षकांचा सहभाग, आशयाची गुणवत्ता आणि त्याचा प्रत्यक्ष परिणाम यांना महत्त्व देत आहेत. रुपयांमध्ये सहा आकडी किंवा त्याहून अधिक उत्पन्न मिळवणाऱ्या ‘यू-ट्यूब’ चॅनेलची संख्या वर्षभरात ३० टक्क्यांहून अधिक वाढली. उत्पन्न मिळवणाऱ्या क्रिएटरपैकी ७३ टक्के जणांनी ‘यू-ट्यूब’ हे प्रमुख उत्पन्नाचे साधन असल्याचे सांगितले.
एका व्हिडिओमुळे किती प्रकारचे रोजगार निर्माण होतात?
एका व्हिडिओमागे केवळ क्रिएटर नसतो. चित्रीकरण, लेखन, संपादन, ध्वनिमुद्रण, ग्राफिक्स, विपणन आणि उत्पादन व्यवस्थापन अशा अनेक कामांमध्ये रोजगार निर्माण होतात. लोकप्रिय चॅनेलभोवती छोटी व्यावसायिक टीम तयार होते. ‘यू-ट्यूब’वरून उत्पन्न मिळवणाऱ्या क्रिएटरनी गेल्या वर्षभरात तीन लाखांहून अधिक प्रशिक्षणार्थींना कामाची संधी दिली. चॅनेल असलेल्या लघु आणि मध्यम उद्योगांपैकी ७३ टक्के उद्योगांनी ‘यू-ट्यूब’मुळे प्लॅटफॉर्मच्या पलीकडेही व्यवसाय वाढवण्यास मदत झाल्याचे सांगितले.
स्थानिक भाषांना जागतिक प्रेक्षक मिळताना कोणती आव्हाने आहेत?
भारतीय चॅनेलला एकूण पाहण्याच्या वेळेपैकी १५ टक्क्यांहून अधिक वेळ भारताबाहेरील प्रेक्षकांकडून मिळतो. त्यामुळे मराठीसह प्रादेशिक भाषांतील कंटेंटला जागतिक बाजारपेठ उपलब्ध होत आहे. मराठी कलाकार संजू राठोड यांच्या चॅनेलने ६८ लाख सबस्क्रायबर आणि ३.४ अब्ज व्ह्यूजचा टप्पा गाठला आहे. या वाढीसोबत मुलांच्या ऑनलाइन सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर आहे. पालकांची संमती, वय पडताळणी आणि पालकांच्या देखरेखीखालील खाती यांसारख्या उपायांवर चर्चा सुरू आहे. त्यामुळे क्रिएटर अर्थव्यवस्थेची वाढ रोजगाराच्या संधींसोबत जबाबदार आणि सुरक्षित डिजिटल वापराची गरजही अधोरेखित करते.