कारात्मक दृष्टिकोन, विधायक काम करण्याची ऊर्जा, काळाबरोबर चालतानाही भूत-वर्तमान घटनांचा तौलनिक विचार करण्याची क्षमता अशा अनेक गुणांमुळे काही माणसांचा सहवासही आपल्याला खूप काही देत असतो. विदुषी गायिका, अभिनेत्री निर्मलाताई गोगटे अशाच आहेत.सन १९५४ ते सन १९७३ हा निर्मलाताईंच्या कारकिर्दीचा बहराचा काळ होता. संगीत नाटकांपासून शास्त्रीय-उपशास्त्रीय संगीताच्या मैफली, भावसंगीताचे कार्यक्रम, आकाशवाणीवरची ध्वनिमुद्रणं, असं सारं एकाच वेळी चालू होतं. मुंबई मराठी साहित्य संघाच्या ‘सं. सत्याग्रही’ नाटकातून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं. पुढे ‘सौभद्र’, ‘मानापमान’, ‘संशयकल्लोळ’, ‘मृच्छकटिक’, ‘विद्याहरण’, ‘एकच प्याला’ आणि ‘स्वयंवर’ या नाटकांतून नायिकेची भूमिका केली. भावपूर्ण सुरेल गायन आणि जोडीन सोज्ज्वळ रूपसंपदा. त्यांच्या कामाचं कौतुक झालं नसतं, तर नवल! ‘भय न मम असा’, पुष्पपराग’, ‘श्रीहरी गोड तुझी’, ‘ओठावरी रोज प्रभाती’ अशी त्यांनी गायलेली पदं, अभंग, भावगीतं लोकप्रिय झाली आहेत.
लहानपणापासूनच निर्मलाताईंना गाण्याची विलक्षण आवड. वडील कै. रामचंद्र बापट संगीतप्रेमी असले, तरी घरात कलेचं फारसं वातावरण नव्हतं, कडक शिस्त होती; परंतु ‘योगायोग’ नावाचा जबरदस्त शुभग्रह त्यांच्या कुंडलीत होता. ‘महिला कला संगम’ या हौशी नाट्यसंस्थेकडून ‘सौभद्र’ नाटकातील ‘सुभद्रे’च्या भूमिकेसाठी निर्मलाला विचारणा झाली. संस्थेत सर्व स्त्रियाच असल्यामुळे घरातून परवानगी मिळाली. तोपर्यंत पं. राजारामबुवा पराडकरांकडे थोडं गायनाचं शिक्षण झालं होतं. एवढ्या तुटपुंज्या पाठबळावर, वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी निर्मलानं हे आव्हान स्वीकारलं आणि पेललंही. ते कदाचित समजून उमजून नसेलही; पण आपल्या गायनप्रेमाला तिनं वाट मोकळी करून दिली. तालाला अवघड अशा ‘पुष्पपराग’ पदापासून सर्व पदं दामूअण्णा पार्सेकरांच्या मार्गदशनाखाली सुरेल गायली. अभिनयाचंही कौतुक झालं. यानंतर याच रंगभूमीवर इतरही नाटकांतून भूमिका केल्या.
याच काळात अर्थशास्त्र आणि इतिहास विषय येऊन निर्मलाताई बी.ए. झाल्या. संस्कृत भाषेच्या परीक्षा दिल्या. ध्यानीमनी नसताना जशी ‘सुभद्रा’ भेटली; तशीच संस्कृत ‘मृच्छकटिकम्’ नाटकातील ‘वसंतसेना’! तमुंबईत ब्राह्मणसभेचे अण्णा जोशी ‘मृच्छकटिकम्’ नाटक बसवत होते. प्रयोगाला अवघे १२ दिवस उरले होते. अचानक ही भूमिका निर्मलाताईंकडे आली. पुण्यात वाडिया कॉलेजमध्ये चिंतामणराव देशमुखांच्या अध्यक्षतेखाली झालेला प्रयोग खूपच रंगला. प्रेक्षकांनी उभं राहून मानवंदना दिली. देशमुखसाहेब म्हणाले, ‘आज मी तो ‘चारुदत्त’ पाहिला, ‘वसंतसेना’ पाहिली.’ सन १९६०मध्ये मुंबईत ‘रंगभवन’ इथं ब्राह्मण सभेचा संस्कृत नाट्यमहोत्सव रसिकांच्या उदंड प्रतिसादानं साजरा झाला. ‘उत्तररामचरित्रम्’ नाटकाच्या परीक्षणात लिहिलं होतं, ‘निर्मला गोगटे यांच्या स्वरातील माधुर्यामुळे नाटक संपलं, तरी त्यांचे सूर प्रेक्षकांच्या मनात रेंगाळत राहिले.’
सन १९५९मध्ये अभियंता मधुकरराव गोगटे यांच्याशी निर्मलाताईंचा विवाह झाला. मधुकररावांच्या प्रोत्साहनामुळे निर्मलाताईंची नाट्य कारकीर्द चालू राहिली. संगीत विषय घेऊन एम. ए. ही पदवी संपादन केली. मराठी, कानडी, गुजराती संगीताचा परस्पर संबंध हे पुस्तक लिहिलं. अनेक गुरुजनांकडून त्यांनी विद्या मिळवली. आज आयुष्याच्या संध्यासमयी त्या समाधानी आहेत. पं. राम मराठे, छोटा गंधर्व असे पट्टीचे गायक-अभिनेते, नटश्रेष्ठ दाजी भाटवडेकर, थोर अभिनेते नानासाहेब फाटक अशा सर्व सहकाऱ्यांविषयी, दिग्दर्शकांविषयी त्यांच्या मनात कृतज्ञता आहे. सरकारचा ‘अण्णासाहेब किर्लोस्कर’ पुरस्कार, पुणे महापालिकेचा ’बालगंधर्व पुरस्कार’ असे सन्मानही मिळाले. या प्रवासात स्वतंत्र भूमिका करण्याची संधी येऊनही काही कारणांनी तो योग जुळून आला नाही. ही सल कधी तरी निर्मलाताईंच्या बोलण्यात डोकावते; पण ते तेवढ्यापुरतंच. पुढच्याच क्षणी पुस्तकात एखादा संदर्भ शोधण्यात त्या गर्क होतात. निर्मलाताईंना मनापासून शुभेच्छा!