साध्या भाषेतील असाधारण काव्यात्मता

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
साध्या भाषेतील असाधारण काव्यात्मता
वी नातेसंबंध, निसर्ग आणि माणूस, माणूस आणि समाज यांच्यातील संबंधांविषयी भाष्य करणारे कवी म्हणून ऋतुराज यांची ओळख होती. सोबतच समाजातील अखेरच्या रांगेत उभा असलेला सामान्य माणूस, स्त्रिया, आदिवासी समूह, उपेक्षित जात-वर्गांतील जनसमुदाय यांच्या जगण्याबाबतची चिंतादेखील व्यक्त झालेली दिसून येते. त्यांच्या कवितांची भाषा साधी, नेहमीच्या वापरातील शब्द, प्रतिमांनी घडलेली असली; तरी तिच्या वैशिष्ट्यपूर्ण मांडणीमुळे, ओळींच्या विचारपूर्वक घडणीमुळे कविताशय संप्रेषित होण्यात प्रत्यवाय येत नसे. त्यांच्या कवितांत लयात्मकता आणि चित्रात्मकता पाहायला मिळते. त्यांच्या कवितांतील राजकीय-सामाजिक विषयांवरील टिप्पणी कधीही आवाजी, घोषणाबाजी करणारी नव्हती. त्यांच्या घटनाप्रधान कविता लोककथांना जवळ जाणाऱ्या शैलीत लिहिलेल्या आहेत. त्यांचे ‘मैं आंगीरस’, ‘पुल पर पानी’, ‘अबेकस’, ‘आशा नाम नदी’ हे काही नावाजलेले कवितासंग्रह आहेत. त्यांना मीरा पुरस्कार, पहल सन्मान, परिमल सन्मान अशा अनेक पुरस्कारांनी गौरवले होते. विनोदकुमार शुक्ल, विष्णू खरे, चंद्रकांत देवताळे, लीलाधर जगुडी, मंगलेश डबराल, विजयकुमार हे त्यांना समकालीन असलेले काही प्रभावी कवी. साधी भाषा आणि आशय व्यक्त करण्याची संयत शैली यांमुळे ऋतुराज यांच्या कवितांची स्वतंत्रपणे दखल घेतली गेली.

ऋतुराज यांना जंगल, झाडे, नद्या, डोंगर यांच्याविषयी प्रचंड आस्था होती. जंगलांत राहणाऱ्या आदिवासी समूहाविषयीदेखील त्यांच्या मनात ममता होती. या समूहातील लोकांचा प्रामाणिकपणा, माणुसकी प्रमाण मानण्याची वृत्ती, निरागस स्वभाव या वैशिष्ट्यांमुळे ते त्यांच्या जगण्याच्या आसपास वावरले. त्यांनी कायम छोट्या शहरांत, जंगल, झाडाझुडपांचे आधिक्य असलेल्या भागांत सरकारी महाविद्यालयांत इंग्रजीचे अध्यापक म्हणून काम केले. त्यांना अजमेर येथे बदली मिळत होती, तर त्यांनी ती रद्द करून अलवर जिल्ह्यातील राजगड या छोट्याशा गावात घेतली; कारण या भागात आंब्याच्या बागा आणि सरिस्का अभयारण्याचे घनदाट जंगल होते. त्यांचे हे जंगल आणि झाडांवरील प्रेम इतके पराकोटीचे होते, की त्यांनी त्यांचा विवाहदेखील सरिस्का अभयारण्याच्या घनदाट जंगलातच केला होता. त्यांनी आदिवासी समूहावर अनेक कविता लिहिल्या आहेत. त्यांपैकी ‘एक दिन मुरिया शहर आये’ ही कविता खूप गाजली. आदिवासी समूहाला ते राहत असलेले डोंगर कापण्यासाठी शहरात मजूर म्हणून आणलेले असते, अशी विरोधाभासी स्थिती कवी या कवितेत व्यक्त करतो. हे विस्थापनाचे दुःख कवी कोणतीही भावुक टिप्पणी न करता संप्रेषित करतो. शहरापासून दूर जंगलाच्या सान्निध्यात राहणाऱ्या माणसाचे निरागस आणि नितळ जग कवी ‘जंगल के दावेदार’ या कवितेत उभे करतो. या लोकांना ‘महाराणीच्या शानदार मेजवानीची बातमी नको असते, तर त्यांना केवळ सुकलेली लाकडे हवी असतात,’ असे कवी लिहितो; तेव्हा शहर आणि दुर्गम ग्रामीण भाग येथे राहणाऱ्या लोकांच्या जगण्यातील प्रचंड अंतरच दाखवून देतो.
ऋतुराज यांच्या कवितांचे वैशिष्ट्य म्हणजे नेहमीच्या परिचित गोष्टींकडे पाहण्याची त्यांची निराळी नजर. ही नजर वाचकाला चकित करते. वानगीदाखल ‘खांसी’ ही कविता पाहता येईल. या कवितेत सतत खोकणाऱ्या वृद्ध पती-पत्नीविषयी तो लिहितो, ‘म्हाताऱ्या पती-पत्नीचा एकसारखाच एकाच वेळेला उबळ येणारा खोकला दरवाजापाशी उभ्या असणाऱ्या मृत्यूला दूर राहण्याचा इशारा करीत असतो.’ खोकला येणे आणि त्या क्षणी निराश, खिन्न वाटणे ही नेहमीची घटना आहे; पण खोकलाच मृत्यूला इशारा देतो आहे, ही कल्पना खिन्नतेतही सकारात्मक काही पाहण्याच्या कवीच्या आशावादी वृत्तीचा परिचय देते. पुढे तो ‘प्रेमात प्रतीक्षा करणाऱ्या अधीर माणसाचे खोकणे प्रत्येक क्षणाला निराशेला बाहेर ढकलत असते,’ असं म्हणतो तेव्हा तर तो खोकण्याला असलेली एकच एक निराशापूर्ण छटा बाजूला सारून त्याच्या वेगवेगळ्या तऱ्हा वाचकाला पाहायला भाग पाडतो.

त्यांच्या कवितांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, त्यांतील सर्वसाधारण माणसांचे गजबजलेलं विश्व होय. त्यांच्या कवितांमधून फुले विकणारे, झाडू-चटया विकणारे, प्लॅस्टिकच्या टोपल्या विकणारे, कानातला मळ काढणारे, हॉटेलांत काम करणारे आणि रस्त्यावर गाणी गाऊन भीक मागणारे अशा समाजाच्या तळागाळात जगणाऱ्या माणसांच्या इच्छा-आकांक्षा, हर्ष-खेद यांचे प्रत्ययकारी चित्रण झालेले दिसते. त्यांपैकी ‘लड़का’ ही रस्त्यावर गाणे गाऊन भीक मागणाऱ्या मुलावर लिहिलेली अप्रतिम कविता आहे. कवी त्या मुलाचे चित्र उभे करण्यासाठी दृश्यात्मक कथनाचे उपयोजन करतो. त्याच्या जगण्यातील वेदना मुखर करण्यासाठी सिनेमात जसा व्यापक प्रदेश दाखवण्यासाठी थोडा उंचावरून घेतलेला एरियल शॉट असतो, तशा पद्धतीने संपूर्ण आशिया खंडात कायकाय चांगल्या गोष्टी आहेत, याचे मनोहारी चित्र उभे करतो. त्यांच्यासमोर या उदास, सर्वस्व हरवलेल्या मुलाला दाखल करतो.

त्यांनी भारतातील राजकीय, सामाजिक क्षेत्रांचा ऱ्हासाकडे जाणारा प्रवास खूप आधीच ओळखला होता. या पतनशीलतेमुळे समाजात निर्माण होणारे क्रौर्य, राजकारणातील हिंस्रपणा यांविषयी त्यांनी खूप संयतपणे, कोणतीही आवेशपूर्ण भाषा न योजता भाष्य केले आहे. ‘दौड़ते हुए’ या कवितेत आधुनिक काळातील आपल्या समाजात खून करणारे किंवा मोठ्या परिप्रेक्ष्यात पाहिल्यास सामूहिक हिंसाचारात सहभागी असणारे लोक कसे सहज वावरत असतात, याचे चित्र उभे केले आहे. कवी लिहितो, ‘आता तो खून करून पळून जात नाही / उलट शहराच्या स्वच्छतेसाठी आयोजित केलेल्या / पळण्याच्या शर्यतीत भाग घेतो.’ एखादा मनुष्य कुणाचा तरी खून करतोय आणि तोच स्वच्छतेसाठी आयोजित कार्यक्रमात सहभागी होतो आहे, या परस्परविरोधी प्रतिमांतून या कवितेचा सुरुवातीचा उपरोधिक सूर कायम राहून आशय अधिक गडद होतो. त्यांच्या सामाजिक-राजकीय आशय व्यक्त करणाऱ्या कवितांत ‘प्रेतबाधा’, ‘निर्लज्ज व्यवस्था का प्रश्न’, ‘चुप रहने में’ या लक्षवेधी आहेत.

भारतीय समाजात कोणताही संवेदनशील, सहृदयी कवी स्त्रीला भोगावं लागणारे दुःख वगळून पुढे जाऊच शकत नाही. ऋतुराज यांनीही ‘स्त्रीवग्गो’, ‘फूलवाली’, ‘दाल’, ‘धुआँ,’ ‘कन्यादान’, ‘माँ का दूध’ अशा अनेक कवितांतून स्त्रीच्या वाट्याला येणारा यातनादायी काळ, संघर्ष, पीडा आविष्कृत केले आहे. यांपैकी ‘माँ का दूध’ या कवितेत एका मजूर स्त्रीचे धावत्या ट्रकमध्ये बाळाला दूध पाजण्याचे आणि त्या क्षणी तिच्या शरीराच्या होणाऱ्या हालचालीमुळे स्तनाग्रे बाळाच्या तोंडून निसटू नयेत म्हणून तिच्या नवऱ्याने तिचे दोन्ही खांदे पकडून ठेवण्याचे दृश्य निव्वळ स्त्रीच नाही, तर एकूणच अभावग्रस्तांच्या जीवनातील संघर्ष दर्शवते. कवितेचा शेवट मात्र कवी एका अवचित क्षणी दुधाची एक धार बाळाच्या तृप्त, अर्धवट बंद डोळ्यांना भिजवून जाते या दृश्याने करतो. जगणे कितीही कठीण, निष्ठुर वाटत असले, तरी आनंदाच्या छोट्या क्षणांतूनच जगण्याची उमेद रचावी लागते, असे सूचन तो करतो. हाच आशावाद या कवीच्या एकूण काव्यविश्वाचा गाभा आहे, असे म्हटले तरी हरकत नाही.

(लेखक मराठी कवी , लेखक आणि समीक्षक आहेत.)