१३८ रिक्त जागांसाठी विशेष फेरी

Contributed by: मुंबई,म. टा. खास प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
special open admission round for 138 vacancies in medical and dental courses
वैद्यकीय आणि दंत अभ्यासक्रमांच्या राज्य कोट्यातील रिक्त राहिलेल्या १३८ जागा भरण्यासाठी विशेष मुक्त प्रवेश फेरी राबविण्यात येणार आहे. या फेरीच्या निमित्ताने पात्र विद्यार्थ्यांना नव्याने नोंदणी करण्याची संधी देण्यात आली असून, त्यासाठी अाज, २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मुदत आहे. त्यामुळे यापूर्वीच्या प्रवेश फेऱ्यांमध्ये सहभागी न होऊ शकलेल्या पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशाची आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे.

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या वैद्यकीय समुपदेशन समितीने (एमसीसी) वैद्यकीय आणि दंत अभ्यासक्रमांसाठी विशेष मुक्त फेरी राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्यातील रिक्त जागा भरण्यासाठी सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) ही विशेष फेरी जाहीर केली आहे. या फेरीसाठी ३१ ऑक्टोबरपासून नव्याने नोंदणी सुरू झाली आहे. पात्र विद्यार्थ्यांना २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. नोंदणी शुल्क भरण्यासाठी त्याच दिवशी सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत, तर आवश्यक कागदपत्रांच्या रंगीत स्कॅन प्रती अपलोड करण्यासाठी रात्री ८ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
या विशेष फेरीसाठी यापूर्वी प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची संधी नसेल. एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांच्या दुसऱ्या फेरीत जागा मिळूनही प्रवेश न घेतलेले, संस्थेत हजर न झालेले किंवा प्रवेश रद्द केलेले उमेदवार या फेरीसाठी नव्याने नोंदणी करू शकतात. मात्र, त्यांनी तिसऱ्या फेरीसाठी यापूर्वी नोंदणी केलेली नसणे आवश्यक आहे. तिसऱ्या किंवा त्यानंतरच्या मुक्त फेरीत जागा मिळालेल्या उमेदवारांना या प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.

नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ३ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन कागदपत्र पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर पुढील वेळापत्रक जाहीर होईल. विशेष मुक्त फेरीनंतरही जागा रिक्त राहिल्यास आणखी एक मुक्त फेरी होण्याची शक्यता आहे.