जामठाच्या विदर्भ क्रिकेट संघटनेच्या मैदानावर ही लढत सुरू आहे. मध्य प्रदेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फॉर्मात असलेल्या नचिकेत भुतेने सहाव्या षटकात यश दुबेला बाद करून विदर्भाला पहिले यश मिळवून दिले. यानंतर केवळ दुबेची फिरकी चालली. सक्षम पुरोहित आणि चंचल राठोड यांनी थोडा लढा दिला. त्यांनी नवा चेंडू जुना करण्याचा प्रयत्न केला खरा; पण दुबेने ही भागीदारी मोठी होणार नाही, याची काळजी घेतली. अनुभवी फलंदाज रजत पाटीदारही अधिक वेळ मैदानावर स्थिरावू शकला नाही. मध्य प्रदेशचा निम्मा संघ ६४ धावांत माघारी परतला होता.मात्र, मधल्या फळीतील अथर्व महाजन याने मध्य प्रदेशला दोनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. त्याने सारांश जैनसह सहाव्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी रचली. सारांश बाद झाल्यानंतर अथर्वने तळाच्या फलंदाजांना साथीला घेऊन मध्य प्रदेशला चांगली धावसंख्या रचून दिली. त्याने १२३ चेंडूंत पाच चौकार व तीन षटकारांसह ८५ धावा केल्या. दुबेच्या फिरकीसमोर इतर फलंदाजांचा मात्र निभाव लागला नाही. दुबेची ५३ धावांत नऊ बळी ही प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्याची यापूर्वीची सर्वोत्तम कामगिरी ३६ धावांत सहा विकेट अशी होती.
प्रत्युत्तरात मध्य प्रदेशच्या गोलंदाजांसमोर विदर्भाच्या फलंदाजांनीही निराशा केली. कुमार कार्तिकेयने सत्यम भोयार (८), अमन मोखडे (०), दानिश मालेवार (०) यांना माघारी पाठवले. रविकुमार समर्थ आणि ध्रुव शोरेय यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, आवशे खानने रविकुमारला बाद करून ही जोडी फोडली. खेळ थांबला तेव्हा ध्रुव ५६ चेंडूंत २१ धावांवर खेळत होता.
दरम्यान, वेगवान गोलंदाज प्रदीप दाढे, राजवर्धन हंगर्गेकर, तनय संघवी यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर महाराष्ट्राने सोमवारी बंगालचा डाव १४३ धावांत रोखला. महाराष्ट्राने यापूर्वी १९७४मध्येही याच धावसंख्येवर बंगालचा डाव रोखला होता.
संक्षिप्त धावफलक : मध्य प्रदेश - पहिला डाव - ६६.१ षटकांत सर्व बाद २०९ (अथर्व महाजन ८५, सारांश जैन ३४, आवेश खान नाबाद १३, अर्शद खान १२, सक्षम पुरोहित २१, शुभम शर्मा १६, चंचल राठोड १३, हर्ष दुबे २३.१-४-५३-९, नचिकेत भुते १२-१-४६-१, रजनीश गुरबानी ११-२-३०-०, दर्शन नळकांडे ६-०-२५-०, अमन मोखडे ५-०-१३-०, पार्थ रेखाडे ९-०-४२-०) वि. विदर्भ - पहिला डाव - २३ षटकांत ४ बाद ५६ (ध्रुव शोरेय खेळत आहे २१, रविकुमार समर्थ १७, कुमार कार्तिकेय ८-०-२३-३, आवेश खान ६-१-११-१).





