राष्ट्रवादीतील ज्येष्ठांची ‘थांबा व पाहा’ भूमिका

Contributed by: मुंबई,म. टा. खास प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
राष्ट्रवादीतील ज्येष्ठांची ‘थांबा व पाहा’ भूमिका
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत सुरू असलेला वाद काही काळ शमण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बुधवारी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासह ‘देवगिरी’ निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत पुन्हा एकदा पक्षात ज्येष्ठांचा समावेश असलेल्या मध्यवर्ती समितीला विचारात न घेता नियुक्त्या आणि निर्णय घेतले जात असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला.

पार्थ पवार यांनी दोन्ही नियुक्त्या पूर्ण विचाराअंती झाल्या असून किमान त्यांना सहा महिने काम करण्याची संधी द्यावी, तसेच यापुढे पक्षातील सर्व निर्णय मध्यवर्ती समितीच्या माध्यमातून घेण्याची तडजोडीची भूमिका यावेळी मांडली. पार्थ यांचा काहीसा निग्रही परंतु मवाळ सूर पाहून ज्येष्ठांनीही ‘थांबा व पहा’ची भूमिका घेतल्याचे कळते.
पक्षांतर्गत निर्णय आणि नियुक्त्यांवर खासदार पार्थ यांचा वाढता प्रभाव आणि पक्षाच्या मध्यवर्ती समितीला डावलण्यावरून राष्ट्रवादी पक्षात कमालीची नाराजी आहे. या नाराजीमुळेच थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांना दिल्ली बोलावणे धाडले होते. यावेळी शहा यांनी पार्थ पवार आणि ज्येष्ठांना एकमेकांशी जुळवून घेण्यास सांगितले होते. या भेटीनंतर मंगळवारी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक ‘देवगिरी’वर झाली. यावेळी काही आमदारांनी पक्षांतर्गत सुरू असलेल्या वादाविषयी चिंता व्यक्त केली. या बैठकीला १२ तासही उलटत नाहीत तोच बुधवारी सकाळी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी पुन्हा देवगिरीवर धाव घेतली.