ट्रम्प यांना मतधक्का

Contributed by: वृत्तसंस्था,वॉशिंग्टन|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
ट्रम्प यांना मतधक्का
इस्रायलच्या कच्छपी लागून इराणवर केलेला हल्ला आणि व्यापार शुल्काबाबतचा मनमानीपणा याची जबरदस्त राजकीय किंमत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोजावी लागली आहे. संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या मध्यावधी निवडणुकीत अमेरिकेच्या प्रतिनिधीगृह आणि सिनेटमध्ये डेमोक्रॅट्सनी स्पष्ट बहुमत मिळवत ट्रम्प यांचे मनसुबे उधळून लावले. देशांतर्गत वाढलेल्या महागाईने बेजार झालेल्या मतदारांच्या त्सुनामीत रिपब्लिकनांचे पारंपरिक पाठीराखे असलेले राज्यरूपी बालेकिल्लेही उद्ध्वस्त झाले.

इराणवरील हल्ल्यांसाठी अमेरिकी प्रशासनाच्या तिजोरीवर पडलेल्या आर्थिक भाराचा अंतिमतः ताण सामान्यांच्या खिशावर पडला. महागाई भडकल्याने कातावलेल्या मतदारांनी ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला मतपेटीच्या माध्यमातून हिसका दाखवला. पारंपरिक पाठीराख्या राज्यांमध्ये तर ट्रम्प यांनी ‘मी स्वतः मतपत्रिकेवर आहे, असे समजून मतदान करा’, या केलेल्या भावनिक आवाहनालाही मतदारांनी भीक घातली नाही. परिणामी टेक्सास, जॉर्जिया, ओहायो आणि आयोवा यांसारख्या बालेकिल्ल्यांमध्ये रिपब्लिकन पक्षाला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. मेन, दक्षिण कॅरोलिना, उत्तर कॅरोलिना, कॅन्सस, आयोवा येथील सिनेट निवडणुकांमध्येही रिपब्लिकन पक्षाला मार खावा लागला. वर्तमान सिनेटमध्ये रिपब्लिकनांकडे ५३-४७ असे बहुमत होते. मात्र, निकालानंतर हे चित्र बदलले असून डेमोक्रॅट्सकडे आता ५४ जागा असून रिपब्लिकनांचे संख्याबळ ४४ वर आले आहे. तर ४३५ सदस्यांच्या प्रतिनिधीगृहात रिपब्लिकनांची सदस्यसंख्या घटून १३९ झाली असून डेमोक्रॅट्सनी २३१ जागांवर विजय मिळवत बहुमताचा आकडा पार केला आहे. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती.
मतदारांचा संताप

दहापैकी सहा मतदारांनी ट्रम्प यांच्या कामगिरीबद्दल नाराजी व्यक्त केल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले. ट्रम्प यांच्या बढाईखोर आणि खोटे बोलण्याच्या वृत्तीवर मतदारांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. सुमारे ७० टक्के मतदारांना काँग्रेसने अध्यक्षपदावर अधिक नियंत्रण आणि संतुलन ठेवावे, असे वाटत असल्याचे या सर्वेक्षणात आढळून आले. तर ट्रम्प देशहितापेक्षा वैयक्तिक हितांना अधिक प्राधान्य देत असल्याचे निरीक्षणही अनेक (पान १०वर)