‘एनसीएमसी’च्या सक्तीमुळे तोटा

Contributed by: मुंबई,म. टा. खास प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
150 crore loss crisis for st corporation issues arising from ncmc card mandate
एनसीएमसी कार्डच्या सक्तीचा थेट परिणाम एसटी महामंडळाच्या महसुलावर झाला आहे. सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये एसटीच्या तोट्यात तब्बल १५० कोटी रुपयांची वाढ झाली. महिनाभरातील एकूण तोटा २४० कोटी रुपयांहून अधिक नोंदवला आहे. एकीकडे आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी धडपड सुरू असताना चुकीचे धोरणात्मक निर्णय घेतल्याने त्याचा परिणाम महामंडळाच्या तिजोरीवर झाला आहे.

एनसीएमसी कार्डची उपलब्धता आणि नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झालेली नसतानाही कार्ड सक्तीने लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील केवळ ४३ टक्के महिलांकडेच एनसीएमसी स्मार्ट कार्ड असताना उर्वरित महिला प्रवाशांना या निर्णयामुळे अडचणींचा सामना करावा लागला.
परिणामी, महिला प्रवाशांसह त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या अन्य प्रवाशांनीही एसटीकडे पाठ फिरवली आहे. सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये एसटीच्या तोट्यात तब्बल १५० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. महिनाभरातील एकूण तोटा २४० कोटी रुपयांहून अधिक झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे एसटीचा दैनंदिन तोटा थेट सात कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

प्रवासी संख्या घटल्याने एसटीच्या उत्पन्नावर थेट परिणाम झाला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर महामंडळाला अखेर खडबडून जाग आली आणि ७ नोव्हेंबरपासून स्मार्ट कार्ड सक्तीच्या निर्णयात शिथिलता दिली.

मात्र, आर्थिक नुकसानीची भरपाई कशी करायची, हा मोठा प्रश्न महामंडळासमोर आहे. दिवाळीच्या पहिल्या दहा दिवसांतही अपेक्षित उत्पन्नवाढ न झाल्याने एसटी महामंडळासमोरील आर्थिक अडचणीत अधिकच वाढ होणार आहेत.

एप्रिलपासून एसटीला रोज सरासरी दीड कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत होता. मात्र, अचानक हा तोटा सात कोटी रुपयांपर्यंत पोहोचणे ही चिंताजनक बाब आहे. केवळ ४३ टक्के महिला प्रवाशांकडे स्मार्ट कार्ड असताना त्याची सक्ती करण्याचा निर्णय घेण्यामागे कोणते नियोजन होते? प्रत्यक्ष परिस्थितीचा अभ्यास न करता असा निर्णय कोणी घेतला? आणि त्यातून झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीची जबाबदारी कोणाची, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.