त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर येथे शतकांची परंपरा असलेला रथोत्सव यावर्षी देखील धार्मिक विधी पूजापाठ पारंपरिक पद्धतीने साजरा होणार आहे. मंगळवारी (दि. २४) रथोत्सव होणार असून, शुक्रवारी रात्री रथ मंदिराच्या समोर उभा करण्यात आला. रथाची स्वच्छता आणि त्यावर फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. यंदा मंदिरापासून ते लक्ष्मीनारायण चौकापर्यंत रथातून पंचमुखी सुवर्ण मुखवट्याची मिरवणूक निघेल आणि तेथून पुढे कुशावर्त तीर्थ घाटापर्यंत पालखीतून पंचमुखी सुवर्ण मुखवटा मिरवणूक काढण्यात येणार आहे.कारची काच फोडून अडीच लाख लंपास
सिन्नर : अज्ञात चोरट्याने उभ्या कारची काच फोडून आतील रोकड असलेली बॅग लंपास केली. हिवरगाव येथील मार्केटच्या गोदामासमोर शुक्रवारी (दि. २०) दुपारी घडलेल्या या घटनेत दोनशे आणि शंभर रुपयांच्या नोटांच्या स्वरूपातील तब्बल अडीच लाख रुपयांची रोकड चोरीला गेली. या प्रकरणी एमआयडीसी सिन्नर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्वर शाकीर सय्यद (४५) यांच्या मालकीची टाटा हेक्सा कार हिवरगाव येथील मार्केटच्या गोदामासमोर उभी होती. शुक्रवारी दुपारी ४.२८ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने दरवाजाची काच फोडून बॅग चोरून नेली. पोलिसांकडून तपास सुरू आहे.
दुचाकीस्वारास वाचवताना बसची दुभाजकास धडक
निफाड : लासलगाव-विंचूर मार्गावर सिन्नर आगाराची बस दुभाजकावर आदळल्याने अपघात झाला. सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप बचावले. नाशिक-लासलगाव मार्गावरील गाढवी नाल्याच्या पुलाजवळ ही घटना घडली. एसटी बस नेहमीप्रमाणे आपल्या मार्गावरून जात असताना अचानक एक दुचाकीस्वार बसच्या समोर आला. त्यावेळी दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी बसचालकाने प्रसंगावधान राखत बस वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस दुभाजकाला जाऊन धडकली.
बिबट्याकडून
शेळीची शिकार
सिन्नर : दोन दिवसांपूर्वी बिबट्याने रात्री पायी जाणाऱ्या साईभक्तावर हल्ला केला होता. त्यानंतर रामनाथ हजारे यांच्या वस्तीवर बिबट्याने शेळी ठार केली. मलढोण शिवारात बिबट्याचा वावर असल्याने शेतवस्तीवरील ग्रामस्थ आधीपासूनच सतर्क होते. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.