Contributed by: म. टा. विशेष प्रतिनिधी,नाशिक|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
शाळांसाठी या क्रीडा साहित्याची खरेदी
महापालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या ७२ शाळांमधील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी १ कोटी ९ लाख ७७ हजार १४५ रुपये खर्चाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना विविध क्रीडा प्रकारांचा सराव करण्यासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध होणार आहे. या प्रस्तावानुसार ५८ प्रकारच्या क्रीडा साहित्याची खरेदी केली जाणार आहे.
महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात खेळांचे महत्त्व लक्षात घेऊन शिक्षण विभागाने हा प्रस्ताव तयार केला आहे. शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक विकास, शिस्त, सांघिक भावना आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना क्रीडा उपक्रमांमध्ये सहभागी होता यावे, या उद्देशाने क्रीडा साहित्याची मागणी करण्यात आली होती. शाळांमध्ये क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे, विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविणे, तसेच विभागीय, राज्य व राष्ट्रीय स्पर्धांसाठी विद्यार्थी तयार करण्याच्या दृष्टीने क्रीडा साहित्याची खरेदी केली जाणार आहे.क्रीडा साहित्याच्या खरेदीसाठी स्थानिक पुरवठादारांकडून बाजारभाव मागविण्यात आले होते. त्यानुसार प्राप्त दरांचा विचार करून अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. महासभेने या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. या खरेदीचा खर्च ‘विविध कल्याणकारी योजना खर्च’ या लेखाशीर्षातून करण्यात येणार आहे. क्रीडा साहित्य उपलब्ध झाल्यानंतर महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना क्रीडा सराव आणि विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
क्रीडा साहित्यामध्ये कॅरम बोर्ड, कॅरमच्या सोंगट्या, स्ट्रायकर, बुद्धिबळ, टेबल टेनिस रॅकेट व बॉल, बॅडमिंटन रॅकेट, नेट व शटलकॉक, योगा मॅट, स्किपिंग रोप, डंबेल सेट, मल्लखांब रोप, रिले बॅटन, क्लॅपर, वजनकाटा, मोजपट्टी, मार्किंग कोन, मेडिसिन बॉल, बास्केटबॉल सेट, डार्ट बोर्ड, लेझीम, क्रिकेट साहित्य, फुटबॉल, व्हॉलीबॉल, खो-खो पोल, थ्रोबॉल, भालाफेक, गोळाफेक, लांब उडीसाठी टेकऑफ बोर्ड, अडथळ्यांची शर्यत, लगोरी, कबड्डी मॅट आदी ५८ प्रकारच्या साहित्याचा समावेश आहे.