गळतीमुळे होणारा पाण्याचा अपव्यय, त्यामुळे शेवटच्या टोकावरील गावांना पाण्यासाठी करावी लागणारी प्रतीक्षा आता थांबणार आहे. भोजापूर धरणातून माळवाडी आणि दुशिंगपूर पाझर तलावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पूरचारीचा निमोण ते निऱ्हाळे हा पाच किलोमीटरचा टप्पा बंदिस्त पाइपलाइनद्वारे विकसित करण्यात येणार आहे. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून राज्याच्या जलसंपदा विभागाच्या विशेष दुरुस्ती अंतर्गत या कामासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
पूरचारीला पहिल्या पाच किलोमीटरमध्ये ठिकठिकाणी गळती होत असल्याने पाण्याचा अपव्यय होतो. परिणामी, शेवटच्या टोकावरील दुशिंगपूर पाझर तलावापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागतो. त्यातच मागील भागातील काही शेतकरी परस्पर कालवा फोडून पाणी घेत असल्याने पुढील गावांना अपेक्षित प्रमाणात पाणी मिळत नाही. त्यामुळे लाभक्षेत्रातील गावांना हक्काच्या पाण्यासाठी वारंवार आंदोलने करावी लागत होती.सध्या या पूरचारीतून दरवर्षी १० ते १२ क्युसेस क्षमतेने पाणी सोडण्यात येते. मात्र, गळती आणि अनधिकृत पाणीउपशामुळे शेवटपर्यंत अपेक्षित पाणी पोहोचत नाही. बंदिस्त पाइपलाइनमधून सुरुवातीपासून २५ क्युसेक क्षमतेने पाणी वाहून नेण्याचे नियोजन आहे. त्यामुळे गळती टळून पुरेशा दाबाने पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. दुशिंगपूर आणि माळवाडी हे दोन्ही पाझर तलाव प्रत्येकी ५० दशलक्ष घनफूट क्षमतेचे आहेत. या तलावांच्या पुनर्भरणाला लाभ होणार आहे.