पक्षीनिवडीची ‘फडफड’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
पक्षीनिवडीची ‘फडफड’
ना शिकचा शहर पक्षी कोणता? गिधाड, कावळा की अन्य आणखी कोणता? गेल्या काही दिवसांपासून या पक्षी मानचिन्ह निवडीवरून असा काही गदारोळ सुरू आहे की, जणू लगेचच हजारो पक्ष्यांचे जीव वाचविण्यासाठी ही सारी मंडळी धावाधाव सुरू करणार आणि ज्यातून लवकरच शहरात दुर्मीळ झालेल्या पक्ष्यांचे थवेच्या थवे दिसतील. मुळात हे अभियान केवळ एक सुरुवात आहे. पक्षी मानचिन्ह निवडण्यामागचा उद्देश कोणत्याही एका पक्ष्याला प्रतिष्ठा देणे एवढ्यापुरता खचितच मर्यादित नाही. मुद्दा पर्यावरणदृष्टीचा आहे. शहराच्या पर्यावरणीय जाणिवेला दिशा देणे, नागरिकांना निसर्गाशी जोडणे आणि नामशेष होऊ पाहणाऱ्या पक्ष्यांच्या संवर्धनाची चळवळ उभी करणे, हा या मोहिमेचा खरा उद्देश. त्यामुळे गिधाड की कावळा हा वाद नव्हे; तर नाशिककर पर्यावरण संवर्धनासाठी सजग आहेत का, त्यांची पर्यावरणदृष्टी तेवढी परिपक्व आहे का, याची ही एकप्रकारे तपासणीच म्हणावी लागेल.

गेल्या महिन्यात पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने पक्षी मानचिन्ह निवडण्याच्या उपक्रमाला सुरुवात झाली, तसे पाठोपाठ वादही सुरू झाले. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मोहिमेला प्रारंभ झाला खरा; परंतु त्याचबरोबर गिधाड-कावळाच का, इतर पर्याय का नाहीत, हे दोन्ही पक्षी अशुभ आहेत, पक्षीमित्र अन् इतर पर्यावरणवाद्यांना विश्वासात घेतले का नाही, अशा प्रश्नांचा भडिमार झाल्याने वाद वाढला. महापालिकेनेही मग नसते बालंट नको म्हणून मोहिमेपासून अंतर राखले. या मंडळींचे काही प्रश्न नक्कीच रास्त असू शकतात. निवडप्रक्रिया अधिक व्यापक आणि अधिक शास्त्रीय असायला हवी होती. हा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम लोकांपर्यंत नेण्यासाठी अधिक वेळ आणि जनजागृती आवश्यक होती, हेही बरोबरच. परंतु म्हणून अभियान हाणून पाडण्यासाठी हेतूपुरस्सर प्रयत्न करणे म्हणजे पर्यावरणाबाबत संकुचित दृष्टीचा प्रत्यय देण्यासारखेच. वास्तविक, मागील दोन दशकांत देशातील अनेक शहरांनी आपले शहर पक्षी निवडले. मुंबईने तांबट पक्ष्याला मान दिला. नागपूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, सांगली अशा शहरांनी स्थानिक पक्ष्यांना पर्यावरणीय प्रतीक म्हणून स्वीकारले. दिल्लीने चिमणीच्या संरक्षणाचा मुद्दा पुढे आणला. अशा उपक्रमांचा अर्थ एवढाच की, शहर स्वतःच्या जैवविविधतेबद्दल सजग होत आहे. या प्रजातींच्या संवर्धनाबाबत खरोखरच पोटतिडकीने आणि वेगाने प्रयत्न होत आहेत का, हा चिंतनाचा मुद्दा ठरू शकतो; परंतु नाशिकसारख्या सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील, गोदावरीच्या काठी वाढलेल्या शहराने या अभियानात अग्रस्थानी असायला हवे होते. त्या तुलनेत आपल्याकडे अंमळ उशिराने ही चळवळ सुरू झाली आहे. पन्नासपेक्षा अधिक पक्षांची नावे चर्चेत आली, हेही नसे थोडके!
दुर्दैवाने नाशिकमध्ये कोणताही विषय वादाविना पुढे सरकत नाही. गोदावरीची स्वच्छता असो, तपोवनातील वृक्षतोड असो, की पांजरपोळ. आता पक्षीनिवडही त्याच मार्गाने गेली. शहरीकरणाच्या रेट्यामुळे पर्यावरणाच्या विषयात मतभेद स्वाभाविक म्हणावे लागतील; परंतु मतभेद आणि अडथळे यात फरक असतो. पर्यावरणाच्या नावाने चमकोगिरी करणाऱ्या काही लोकांचा ‘इगो’ दुखावल्याने वाद झडत आहेत, तर काही लोकांना मुद्दामहून विश्वासात न घेतल्याची ओरड दुसऱ्या बाजूने होते आहे. एकूणात पर्यावरणासाठी झटणाऱ्यांतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत, ज्यामुळे अलीकडच्या काळात शहराविषयी निर्माण झालेल्या नकारात्मक दृष्टिकोनातही भर पडत आहे. चांगल्या उपक्रमाकडेही संशयाच्या नजरेने किंवा कोणाला श्रेय मिळेल या दृष्टिकोनातून पाहणे चुकीचेच आहे. पक्षी-पर्यावरण वाचविण्यासाठी कोणी पुढे येत असेल, तर अशांची वाट अडविण्याचे उद्योग थांबायलाच हवेत. प्रश्न विचारणे आवश्यक. प्रक्रियेतील त्रुटी दाखवणेही लोकशाहीत गरजेचेच; परंतु प्रत्येक उपक्रमाच्या मुळावर उठणे, सोशल मीडियावर संशयाचे धुरळे उडवणे आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांचे खच्चीकरण करणे, हे पर्यावरणप्रेम नव्हे. खरे तर ती या चळवळीची हानी आहे. पक्षी निवडीबाबत इतकी वर्षे सगळेच कसे झोपले होते, हाही प्रश्नच. आपण प्रत्येक चांगल्या गोष्टीला वादाच्या दलदलीत ओढणार की त्यातून काही सकारात्मक घडवणार, हे नेमकेपणाने ठरवावेच लागेल.

पक्षी मानचिन्ह किंवा आयकॉन निवडताना त्या-त्या शहराचे धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वेगळेपण लक्षात घेणे अपेक्षित असते, तर त्याचे शहरातील शिल्लक पर्यावरणाशी असलेले नातं तपासणे आवश्यक असल्याचे काही मंडळींचे म्हणणे पडले. त्या दृष्टीने विचार केल्यास गिधाड आणि कावळ्यालाही नाशिकचा इतिहास, संस्कृती आणि धार्मिक परंपरेत खोल स्थान आहे. गिधाडाचा संबंध जटायूशी जोडला जातो. या पक्ष्याने सीतेच्या रक्षणासाठी रावणाशी झुंज दिली, हे भारतीय मनात रुजलेले आहे. गिधाडाला ‘निसर्गाचा स्वच्छतादूत’ म्हटले जाते. मृत जनावरांचे अवशेष भक्ष्य करून ते अन्नसाखळी अबाधित ठेवते. कावळासुद्धा शहरी परिसंस्थेतील महत्त्वाचा सफाईदार आहे. कावळ्याचे नाते पिंडदान, श्राद्धविधी आणि काकस्पर्शाशी आहे. याशिवाय मानवी वस्तीजवळ चिमणीचे अस्तित्व हे पर्यावरणीय आरोग्य चांगले असण्याचे प्रतीक. मोर, टिटवी, तांबट, खंड्या, दयाळ असा प्रत्येक पक्षी परिसंस्थेतील आवश्यक घटक आहे. नाशिकसारख्या धार्मिक नगरीत या परंपरांचे सामाजिक-सांस्कृतिक महत्त्व आजही टिकून आहे. परंतु शोकांतिका अशी की, ज्या दुर्मीळ प्रजातींची संख्या झपाट्याने घटत आहे, त्यांच्या संवर्धनापेक्षा आपण त्यांच्या निवडीवरून वाद घालत बसलो आहोत. शहराचे पक्षी मानचिन्ह म्हणून गिधाड निवडले, तर कावळ्याचे महत्त्व कमी होत नाही आणि कावळा निवडला, तर चिमणीही या स्पर्धेतून बाद होत नाही. ही निवड प्रातिनिधिक आहे, अंतिम नाही. तिचा हेतू पक्षीविश्वाकडे शहराचे लक्ष वेधणे हा आहे. दुर्दैवाने अनेकांना हे कळत असूनही वळत नाही, अशी स्थिती आहे. २५ लाखांच्या शहरातील जेमतेम तीन हजार लोक या ऑनलाइन सर्व्हेत सहभागी झाले, हीसुद्धा शोकांतिकाच. शहराच्या भल्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेकडे लोकांनीच पाठ फिरवणे म्हणजे केवढे औदासिन्य!

मूळ प्रश्न आता पक्षी निवडीचा नाही, तर कृतीचा आहे. गिधाडासाठी सुरक्षित अधिवास, विषमुक्त खाद्यसाखळी, मृत जनावरांच्या व्यवस्थापनाची वैज्ञानिक पद्धत स्वीकारली जायला हवी. हरियाणातील प्रजनन केंद्रात वाढलेली काही गिधाडे लवकरच सह्याद्रीत सोडली जाणार असल्याने त्यांच्यासाठी नाशिकला नक्कीच काम उभे करता येऊ शकते. गिधाड रेस्टॉरन्टबाबत कित्येक वर्षांपासून चर्चेपलीकडे काही घडत नाही. अशावेळी इतर पक्षी गिणतीतच नाहीत. परिसरात आढळणारे शिंजीर-बुलबुल-पोपट-पिंगळा-शिक्रा अशा साऱ्यांनाच जपायला हवे. त्यासह डोंगरकड्यांचे संरक्षण, फळझाडे, जलस्रोत, रासायनिक प्रदूषणावर नियंत्रण, वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन असे प्रत्यक्ष उपायही आवश्यकच. फक्त फलक लावून, छायाचित्रे काढून किंवा एक दिवसाचा कार्यक्रम करून पक्षी वाचू शकणार नाहीत. शहराचे नियोजन पक्षी, प्राणी, वृक्ष, नदी या सगळ्यांना सामावून घेणारे असावे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तोंडावर शहरात विकासकामे सुरू असताना पक्षी व निसर्गप्रेमींनी एकजुटीने पर्यावरणाच्या प्रश्नावर आपण एक आहोत, हे दाखवून द्यायला हवे. कुंभमेळा प्राधिकरण, महापालिका आणि इतर स्थानिक यंत्रणा चुकत असतील, तर त्यांच्यावर वचक ठेवायला हवा. शहरातील हरित पट्टे, डोंगररांगा, नदीकाठ, पक्ष्यांचे अधिवास यांचे संरक्षण करण्यासाठी आवाजही उठवला जावा. आपण हरितकुंभाचा जागर करीत असू, तर पक्षी संवर्धन हासुद्धा त्याचा गाभा असायला हवा. गोदावरी नदी स्वच्छ ठेवायची, तपोवन वाचवायचे, पांजरपोळ जपायचे, अंजनेरीतील गिधाड संवर्धनाचा वारसा पुढे न्यायचा आणि शहरातील मुलांना पक्षी ओळखायला शिकवायचे हे सारे उपक्रम एकाच चळवळीचा भाग आहेत, तसे नदी, झाड, डोंगर, पक्षी हे सगळे एकाच परिसंस्थेत येतात. एकाच साखळीने ते जोडलेले असतात. ही साखळी तुटली तर शहर वाचणार नाही. म्हणूनच पक्षी निवडीबाबतचा वाद आता थांबावा. आणखी काही वर्षांनी दुसरी प्रजाती निवडण्याची संधीही आहेच. कोणाची हरकतच असेल आताच दुसरा अन् तिसरा शहर पक्षीही निवडता येईल. या घडीला पर्यावरण संवर्धनाची चळवळ उभी करणे महत्त्वाचे. नाशिकचा पक्षी कोण, यापेक्षा आपण पक्ष्यांसाठी काय करते, हा प्रश्न जास्त मोठा आहे. निसर्ग हा फलकबाजी किंवा केवळ पाठ्यपुस्तकांत नव्हे, तर आपल्या अंगणात, आवारात, नदीकाठी शोधला जायला हवा. सकाळी चिमणीचा चिवचिवाट किंवा कावळ्याची कावकाव ऐकू येत असेल, आकाशात इतर पक्षी घिरट्या घालत असतील, तर तो खरा समतोल. पक्षी वाचले तर निसर्ग वाचेल. निसर्ग वाचला तर माणूसही वाचेल. तेव्हा मानचिन्हाचा वाद नको. सारे मिळून संवर्धनाची भूषणावह चळवळ उभारू या. आणि तेच साऱ्यांच्या भल्याचे!

पक्ष्यांच्या दुर्मीळ प्रजाती नामशेष होत आहेत, त्यांच्या संवर्धनापेक्षा आपण त्यांच्या प्रातिनिधीक निवडीवरून वाद घालत बसलो आहोत. नाशिकचे पक्षी मानचिन्ह कोणते, यापेक्षा निसर्गाच्या संवर्धनासाठी काय प्रयत्न होत आहेत, त्यासाठी शहर खरोखरच पुढाकार घेते आहे काय, हे महत्त्वाचे.