‘सिंधू जलवाटप करारावर (आयडब्ल्यूटी) भारताची भूमिका अत्यंत स्पष्ट असून, त्यात अजिबात बदल झालेला नाही,’ असे परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी स्पष्ट केले. दिल्लीत ‘एससीओ सिव्हिलायझेशनल डायलॉग फोरम’मध्ये सहभागी होण्याचे पाकिस्तानचे मंत्री मुसदिक मलिक दिल्लीत आले असताना केंद्राने याबाबत भूमिका मांडली.
गेल्या वर्षी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेऊन सिंधू जलवाटप करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतातील कार्यक्रमात पाकिस्तानी मंत्री सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने सिंधू जलवाटप कराराचा मुद्दाही चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर, आपल्या द्विसाप्ताहिक पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी याबाबत भारताची भूमिका मांडली.पाकिस्तानचे मंत्री मलिक यांच्याकडे सांस्कृतिक खाते नसताना आणि त्यांनी कथितपणे सिंधू जलवाटप कराराबाबत वक्तव्ये केली असताना भारताने ही बाब अधोरेखित केली. ‘एससीओ’चा हा बहुपक्षीय कार्यक्रम असून, त्यासाठी पाकिस्तानसह ‘एससीओ’च्या सर्व सदस्यांना निमंत्रणे पाठवली आहेत,’ असेही जयस्वाल यांनी नमूद केले.
‘संवाद वृद्धिंगत करण्यात संस्कृतीची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते,’ असे मत पाकिस्तानचे हवामानबदल मंत्री मुसदिक मलिक यांनी शनिवारी व्यक्त केले. मात्र, ‘आपण ‘बहुपक्षीय संवादा’च्या अनुषंगाने दिल्लीत आलो आहोत,’ असे त्यांनी स्पष्ट केले. ‘एससीओ’ परिषदेच्या पार्श्वभूमीवर, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारतील का, असा प्रश्न पत्रकारांनी मलिक यांना विचारला होता. ‘हा मंच बहुपक्षीय आहे. आम्हीही इथे बहुपक्षीय चर्चेसाठी आलो आहोत. संस्कृती केवळ दोन देशांपुरती मर्यादित नसून, तिची प्रादेशिक भूमिका असते. आपण एकमेकांना, एकमेकांची विचारपद्धती आणि जीवनमान समजून घेतल्याशिवाय आपली प्रगती होणार नाही. संवादाच्या माध्यमातूनच आपल्याला एकमेकांचे दृष्टिकोन कळतील,’ असे मलिक म्हणाले.