नाशिकच्या तर्रीबाज मिसळीवर ‘एफडीए’ची वक्रदृष्टी

Contributed by: नाशिक,म. टा. प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•

या हॉटेलांवर कारवाई

नाशिकच्या तर्रीबाज मिसळीवर ‘एफडीए’ची वक्रदृष्टी
झणझणीत तर्री आणि खमंग चवीसाठी राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या नाशिकच्या मिसळीकडे अन्न व औषध प्रशासनाची वक्रदृष्टी पडली असून, प्रसिद्ध मिसळ व्यावसायिकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांची पायमल्ली करणाऱ्या शहरातील चार अन्न आस्थापनांचे परवाने आणि एका आस्थापनेचे नोंदणी प्रमाणपत्र ‘एफडीए’ने एकाच दिवसात निलंबित केले. या कारवाईमुळे मिसळप्रेमींमध्ये खळबळ उडाली.

अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे, सहआयुक्त मंगेश माने; तसेच सहायक आयुक्त (अन्न) विनोद धवड आणि ज्ञानेश्वर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली १९ नोव्हेंबर रोजी नाशिक शहरातील विविध हॉटेल व कॅफेंची तपासणी करण्यात आली. या तपासणीत अन्न सुरक्षा व मानके नियम, २०११ मधील अनुसूची-४ च्या तरतुदींचे उल्लंघन आणि अस्वच्छ परिस्थिती आढळून आल्याने शुक्रवारी (दि. २०) ही कारवाई करण्यात आली. यात कॉलेज रोडवरील ‘तुषार मिसळ’चा परवाना निलंबित करण्यात आला. जुना गंगापूर नाका येथील ‘हॉटेल विहार’मध्ये अस्वच्छता आणि अन्न तयार करण्याच्या ठिकाणी कीटक व उपद्रवी जीवांचा प्रादुर्भाव दिसून आला. सातपूर एमआयडीसीतील ‘हॉटेल श्यामसुंदर’मध्ये अस्वच्छता व बांधकामविषयक नियमांचे उल्लंघन आढळले. पंचवटीतील आडगाव फाटा परिसरातील ‘हॉटेल महाराजा काठियावाडी’मध्ये अस्वच्छतेसह स्टोअर रूममध्ये उंदिराची विष्ठा, मुदतबाह्य अन्नपदार्थ आणि धूळ-कीटक रोखण्याची व्यवस्था नसल्याचे समोर आले. कॉलेज रोडवरील कॅफे दुर्गाचे नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करण्यात आले आहे. संशय आढळल्यास complaints.mahafda.in वर तक्रार नोंदवण्याचे आवाहन नागरिकांना ‘एफडीए’ने केले आहे.
दर रविवारी नाशिककर मोठ्या प्रमाणाव मिसळीचा आस्वाद घेण्यासाठी बाहेर पडतात. शहरासह आसपासच्या गावांमध्ये अनेक प्रसिद्ध मिसळ असून, तेथे प्रचंड गर्दी होते. मात्र, यातील काही प्रसिद्ध हॉटेलांमध्येच अस्वच्छता, मुदतबाह्य अन्नपदार्थ आणि कीटक आढळून आल्यामुळे नाशिककरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.