खोडाळा रोडवरील लुटारू जेरबंद

Contributed by: घोटी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
खोडाळा रोडवरील लुटारू जेरबंद
त्र्यंबकेश्वरहून खोडाळ्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांच्या कारचा पाठलाग करून, वाहन आडवे लावून चाकूच्या धाकाने पावणेदोन लाखांचा ऐवज लुटणाऱ्या टोळीचा घोटी पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. देवगाव शिवारात मध्यरात्री घडलेल्या या जबरी लुटीच्या घटनेनंतर पोलिसांनी रात्रभर शोधमोहीम राबवत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चार संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली आलिशान कार आणि मोबाइल फोन जप्त करण्यात आले.

रायगड जिल्ह्यातील पेण येथील सागर गोपाळ शेजवळ हे आपल्या कुटुंबीयांसह कारने त्र्यंबकेश्वर येथून खोडाळ्याच्या दिशेने जात होते. मंगळवारी (दि. १७) मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास ते घोटी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खोडाळा रोडवरील देवगाव शिवारात आले असता, कारमधून आलेल्या चार युवकांनी त्यांना थांबवले. तिघांनी फिर्यादी व कारमधील प्रवाशांना चाकूचा धाक दाखवला. प्रवाशांच्या अंगावरील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, एटीएम कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि इतर ऐवज जबरदस्तीने काढून घेत संशयित कारसह पसार झाले. या घटनेत सुमारे १ लाख ७४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लुटण्यात आल्याची फिर्याद घोटी पोलिस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी काशिनाथ हरी खोडे (वय २१), संजय धोंडीराम भांगरे (वय ३०, दोघे रा. भिलमाळ, त्र्यंबकेश्वर), वैभव रंगनाथ झोले (वय १९) आणि किरण गणपत खाडे (वय २९, दोघे रा. धाडोशी, त्र्यंबकेश्वर) या चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक प्रतीक भिंगारदे, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपनिरीक्षक ज्योती नेहे, अंमलदार प्रवीण काकड, नवनाथ शिरोळे, संदीप नागपुरे, सचिन गवळी, मयूर कांगणे आदींनी केली.