जिम प्रशिक्षक, इन्फ्लुएन्सर ‘एफडीए’च्या रडारवर

Contributed by: नाशिक,म. टा. प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•

दाव्यांना बळी पडू नका

Maharashtra Times
शहरातील विविध भागांतील जिम, हेल्थ सेंटर्स तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून हेल्थ सप्लीमेंट्स, प्रोटीन पावडर आणि न्यूट्रास्युटिकल्सची बेकायदा विक्री करणाऱ्या, तसेच दिशाभूल करणारे दावे करणाऱ्या जिम प्रशिक्षक व इन्फ्लुएन्सर्सवर आता कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. तरुणाईमध्ये फिटनेसची वाढती क्रेझ लक्षात घेता, आरोग्याशी खेळ करणाऱ्या खोट्या जाहिराती आणि विनापरवाना विक्रीची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

कोणत्याही जिम प्रशिक्षकाला सप्लीमेंट्स सुचवण्याचा किंवा विक्री करण्याचा अधिकार नाही. नागरिकांनी सप्लीमेंट्स खरेदी करण्यापूर्वी संबंधित विक्रेत्याकडे अन्न व औषध प्रशासनाचा वैध परवाना आहे का, याची खात्री करावी. परवाना नसल्यास प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी; संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
हेल्थ सप्लीमेंट्सचा केवळ आहाराला पूरक असतात. ते शरीरातील कमतरता भरून काढत नाहीत किंवा आजार बरा करत नाहीत. न्यूट्रास्युटिकल्सचा उद्देश केवळ आरोग्य संतुलित ठेवणे इतकाच मर्यादित आहे. वजन व्यवस्थापन किंवा आजारांवरील विशेष आहार केवळ वैद्यकीय देखरेखीखालीच घ्यावा लागतो. कोणतेही उत्पादन थेट वजन कमी करते, असा दावा करणे नियमबाह्य आहे. नाशिककरांनी अशा खोट्या दाव्यांना बळी न पडता सतर्क राहावेे, असे आवाहन करण्यात आले आहे.