दावा भीती निर्माण करणारा : अखिलेश

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
akhilesh yadav yogi adityanaths statement creates fear in society
लखनौ : ‘उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे राज्याच्या मतदार यादीतून १.२७ कोटी हिंदू मतदारांची नावे गायब असल्याचे विधान समाजात भीती पसरवण्याच्या कटाचा भाग आहे,’ अशी टीका समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी शुक्रवारी केली. पक्ष कार्यालयात बोलताना ‘मतदारयादीतून नेमकी किती नावे वगळली गेली आहेत, हे मुख्यमंत्र्यांना अचूक माहीत आहे. हे विधान अत्यंत मोजूनमापून केलेले असून, समाजात भीती पसरवण्याच्या उद्देशाने आहे,’ असेही ते म्हणाले.

कमांडर परिषद शिलाँगमध्ये
शिलाँग : आसाम रायफल्स कमांडर्स कॉन्फरन्स २०२६चे आयोजन १२ ते १३ नोव्हेंबर २०२६दरम्यान शिलाँगमधील लैटकोर येथील मुख्यालय डायरेक्टरेट जनरल आसाम रायफल्स येथे करण्यात आले होते. दोन दिवसांच्या या परिषदेच्या अध्यक्षस्थानी आसाम रायफल्सचे महासंचालक लेफ्टनंट जनरल विकास लखेरा आहेत. परिषदेदरम्यान अधिकाऱ्यांनी विद्यमान सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला.

आंदोलनामुळे पोलिस हाय ॲलर्टवर

छतरपूर : भगवान कृष्णांबद्दल केलेल्या वक्तव्यांवरून यादव महासभेने शुक्रवारी बाबा बागेश्वर धामविरोधात आंदोलनाची हाक दिल्यानंतर मध्य प्रदेश पोलिस सावध असून, छतरपूर जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. कोणताही संघर्ष होऊ नये यासाठी पोलिसांनी व्यापक तयारी केली आहे. यादव महासभेचे अध्यक्ष त्यांच्या समर्थकांसह आज जिल्ह्यात पोहोचण्याची शक्यता आहे, तर बागेश्वर धामचे मोठ्या संख्येने अनुयायी आणि समर्थकही प्रतिआंदोलनासाठी जमले असल्याने हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

ऊर्मिला सनावर हिच्या ‘नार्को टेस्ट’चा आदेश

डेहराडून : अंकिता भंडारी हत्या प्रकरणात डेहराडूनच्या विशेष सीबीआय न्यायालयाने शुक्रवारी अभिनेत्री ऊर्मिला सनावर यांच्या नार्को-विश्लेषण आणि पॉलिग्राफ चाचणीला परवानगी दिली आहे. या चाचण्या गुजरातच्या गांधीनगर येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत केल्या जातील. मात्र, चाचण्या कधी होतील, याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.

तुरुंगात मुलावर लैंगिक अत्याचार

रांची : येथील बिरसा मुंडा मध्यवर्ती कारागृहातील अधिकाऱ्यांसह १९ जणांविरुद्ध एका व्यक्तीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, कच्चा कैदी म्हणून ठेवण्यात आलेल्या त्याच्या २०वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्यात आला; तसेच त्याला अमली पदार्थ सेवन करण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीच्या आधारे गुरुवारी खेलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिक्कीममधील पर्यटकांची सुटका

गंगटोक : पूर्व सिक्कीममधील नथुला, बाबा मंदिर आणि सोमगो तलाव येथे मोठ्या बर्फवृष्टीमुळे अडकलेल्या ९००हून अधिक पर्यटक आणि स्थानिकांची भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती कोअरने सुटका केली. आव्हानात्मक हवामानाच्या परिस्थितीत ही बचाव मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली.