समृद्धी महामार्गावर शुक्रवारी सकाळी विचित्र अपघात झाला. नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर कंटेनर उलटला. रस्ताच बंद झाल्याने त्याला बाजूला नेण्यासाठी वाहतूक थांबविण्यात आली. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या. एक भरधाव ट्रक मागून आला आणि त्याने रांगेतील मागच्या वाहनाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की समोरची १९ वाहने चक्काचूर झाली.
सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीडजवळ, तढेगाव परिसरात चालकाचे नियंत्रण सुटल्याने सकाळी ६.४५ च्या सुमारास सिमेंट मिक्सर ट्रक उलटला. भर रस्त्यात हा मिक्सर आडवा झाला. चार तासांनी या ट्रकला बाजूला करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. मुंबईकडे जाणाऱ्या तिन्ही लेन बंद झाल्या. पोलिसांनी ही बाजू वाहतुकीसाठी बंद केली. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ११.२० च्या सुमारास एक ट्रक सुसाट वेगाने आला. समोर रस्ता बंद आहे आणि वाहनांची रांग लागली आहे, याची त्याला कल्पना नसावी. त्याने पुढील वाहनाला थेट धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती, की समोरील उभ्या १९ गाड्यांना जबर हादरा बसला. या धडकेने कार एकमेकांवर आदळल्या. काही वाहने एकमेकांवर चढली. अनेक गाड्यांचा समोरच्या भागाचा चेंदामेंदा झाला. जखमींना सिंदखेड राजा येथे हलवण्यात आले.समृद्धी महार्गावर दिवाळीच्या दिवसांत गर्दी असते. भाऊबीज आटोपून अनेक कुटुंबे नागपूर आणि आजूबाजूच्या भागांतून पुणे, मुंबईकडे निघाली होती. बव्हंशी वाहने ही सहकुटुंब गावी परतणारी होती. काही जण आपल्या कामानिमित्त जात होते. या वाहनांमधील प्रवाशांना या अपघाताचा जबर धक्का बसला.