हैदराबादमध्ये आयोजित केलेल्या ‘ भारत समिट ’वरून शुक्रवारी काँग्रेस आणि भाजप यांच्यात कलगीतुरा रंगला. या परिषदेच्या ११५ परदेशी वक्त्यांना भारतात प्रवेश नाकारण्यात आला, असा आरोप काँग्रेसने केला, तर भारतविरोधी शक्तींना एकत्र आणण्याच्या उद्देशाने काँग्रेस आणि तेलंगण सरकारने ही परिषद आयोजित केली, असे प्रत्युत्तर भाजपने दिले.
हैदराबादमध्ये ‘भारत समिट’ ही दोन दिवसीय परिषद शुक्रवारपासून सुरू झाली. या परिषदेतील अनेक वक्त्यांना भारतात प्रवेश नाकारण्यात आला किंवा केंद्राने त्यांचे व्हिसा रद्द केले, असे तेलंगणचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी सांगितल्यानंतर शुक्रवारी वाद निर्माण झाला. खासदार शशी थरूर यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपला लक्ष्य केले.‘मी हैदराबादला पोहोचलो तेव्हा मला समजले, की या कार्यक्रमासाठी परराष्ट्र मंत्रालयाने मंजुरी दिलेल्या ३१५ वक्त्यांपैकी ११५ जणांना अखेरीस भारतात प्रवेश नाकारण्यात आला किंवा त्यांचे व्हिसा रद्द करण्यात आले. हे वरवर पाहता गृह मंत्रालयाच्या सूचनेवरून झाले,’ असे शशी थरूर यांनी म्हटले आहे. ‘सरकारने अशी टोकाची पावले कायद्याच्या कोणत्या तरतुदीखाली उचलली हे पूर्णपणे अस्पष्ट आहे,’ असेही थरूर यांनी नमूद केले. ‘एक अभिमानी लोकशाही इतकी असुरक्षित झाली आहे की तिला टीका करतील अशी भीती वाटणारे आवाज दाबावे लागतात, ही लज्जास्पद बाब आहे,’ अशी टिप्पणी थरूर यांनी केली.
केंद्रीय मंत्री आणि तेलंगण भाजप नेते जी. किशन रेड्डी यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिले. ‘भारतावर टीका करणाऱ्या शक्तींना एकत्र आणण्याच्या उद्देशाने ही परिषद आयोजित करण्यात आली,’ असा आरोप त्यांनी काँग्रेस नेतृत्वावर केला.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातमधील गुंतवणुकीला प्रोत्साहन देत आहेत,’ असा आरोप तेलंगणचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी शुक्रवारी केला. ‘गिफ्ट सिटी’सारख्या सुविधा इतर राज्यांना का दिल्या जात नाहीत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ‘बीआरएस आणि भाजप हे दोन्ही पक्ष काँग्रेस सरकारच्या कार्यक्रमांना ‘आंधळेपणाने विरोध’ करीत आहेत, असा आरोपही रेड्डी यांनी केला. तेलंगणाला गुंतवणूक केंद्र म्हणून दाखवण्यासाठी आणि त्याची क्षमता अधोरेखित करण्यासाठी राज्य सरकार या परिषदेचा वापर करील, असे ते म्हणाले.