Jason Huangs Extramarital Affairs Cause A Stir In Nvidia
सारा ‘चिप’ खेळ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
च्च पदावर असलेल्या व्यक्तीच्या हातून वैयक्तिक चुका घडल्या तर त्या चुका केवळ वैयक्तिक राहत नाहीत. त्या चुकांचे परिणामही मग एकट्या त्या व्यक्तीला भोगावे लागत नाही. त्याच्याशी संबंधित संस्थाही संशयाच्या जाळ्यात अडकते. ‘ एन्व्हिडिया ’ या कंपनीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेसन हुआंग यांचे विवाहबाह्य संबंध जगजाहीर झाले आणि खळबळ उडाली. हुआंग हे मागील ३३ वर्षांपासून सीईओ होते. हुआंग यांच्या विवाहबाह्य संबंधांचे पहिले प्रकरण अमेरिकेसाठी काळजीचा विषय आहे. त्यांची ॲलिस हुआंग ही प्रेयसी चिनी हेर असल्याचे अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने म्हटले आहे. हे प्रकरण गाजत असतानाच हुआंग यांची विवाहबाह्य संबंधाची आणखी दोन प्रकरणे समोर आली आहेत. हे विवाहबाह्य संबंध कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आहेत. त्यामुळे हुआंग यांना राजीनामा द्यावा लागला. कंपनीच्या कार्यकारी मंडळाने तो ‘धन्यवाद’ म्हणत तत्काळ स्वीकारला. तातडीचा उपाय म्हणून मुख्य वित्त अधिकारी कॉलेट क्रेस यांच्याकडे प्रभारी मुख्य कार्यकारीपद सोपविण्यात आले, तर हार्वी सी. जोन्स यांना कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे. कंपनीच्या इतिहासात पहिल्यांदा या पदी कुणाची तरी नियुक्ती झाली आहे. जेसन हुआंग, ख्रिस मालकोव्हस्की आणि कर्टिस प्रीम यांनी एप्रिल १९९३मध्ये ही कंपनी सुरू केलेली ‘एन्व्हिडिया’ ही कंपनी आज जगातील सर्वांत मोठी चिप निर्मिती कंपनी आहे. एआय उद्योगाच्या झपाट्याने झालेल्या विकासात या कंपनीचा सिंहाचा वाटा आहे. अमेरिका आता ‘एआय’ नव्हे तर ‘एसआय’ म्हणजे ‘सुपर इंटेलिजन्स’ म्हणते. तसा कायदा त्यांनी केला आहे. जागतिक प्रभावाचे राजकारण खेळण्यासाठी ‘एआय’ हे आजघडीचे आणि भविष्यातीलही भीषण हत्यार आहे. यात अमेरिकेला कोणत्याही परिस्थितीत माघार नको आहे. स्पर्धा थेट चीनशी आहे. अशा या ‘युद्धसम’ परिस्थितीत त्यांच्या देशातील बलाढ्य कंपनीच्या सीईओचे चीनच्या हेराशी संबंध हे गंभीर प्रकरण आहे. हा सारा ‘चिप’ खेळ आहे. या नंतर कंपनीचे समभाग कोसळू लागले आहेत. यातून कंपनी सावरेलही. मात्र हुआंग यांना हाताशी धरून कथित चिनी हेराने काय काय घडवून आणले आहे, याचा सखोल तपास अमेरिकेसाठी महत्त्वाचा आहे. हा तपास जितका समोर जाईल, तितका ‘एन्व्हिडिया’चा त्रास वाढणार आहे. त्याचा जागतिक चिप उद्योगावर कितपत विपरीत परिणाम होतो, त्याचे काय नुकसान होते, याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागून राहणार आहे.