‘मियावाकी’त आर्थिक घोटाळा

Contributed by: म. टा. प्रतिनिधी,पुणे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•

आरोप दिशाभूल करणारे

‘मियावाकी’त आर्थिक घोटाळा
पुणे वनविभागाच्या ६८ हेक्टर क्षेत्रावरील ‘मियावाकी’ रोपवन प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आलेल्या १२ कोटी ६८ लाख रुपयांच्या निधीच्या खर्चात गंभीर आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप युवक काँग्रेसचे अक्षय जैन यांनी केला आहे. उपलब्ध कागदपत्रे, सॅटेलाइट छायाचित्रे आणि प्रत्यक्ष स्थळपाहणीच्या आधारे हा प्रकार समोर आल्याचा दावा त्यांनी केला.

याबाबत गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जैन म्हणाले, ‘मार्च अखेरीस राज्य सरकारकडे मियावाकीसाठी प्रस्ताव सादर झाला, २४ व २८ मार्चला मंजुरी मिळाली, ३१ मार्चला निधी मिळाला आणि त्याच दिवशी संपूर्ण निधी खर्च झाल्याचे दाखविण्यात आले. जानेवारी ते मार्चदरम्यान पूर्वपावसाळी कामे पूर्ण झाल्याच्या नोंदी असताना वेताळ टेकडीवरील प्रत्यक्ष वृक्षतोड मे महिन्यात झाल्याचे पुरावे उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
युवक काँग्रेसच्या पाहणीत अनेक ठिकाणी रोपवन आढळले नाही. प्रकल्पाचे फलक मात्र उभे असल्याचे दिसून आले. काही ठिकाणी लावलेली रोपे वाळलेली दिसली. या प्रकल्पात सुमारे सहा कोटी रुपयांचे खत, दोन कोटी रुपयांचे कोकोपीट, तीन कोटी रुपयांची जेसीबी खोदाई आणि ६० लाख रुपयांची मजुरी दाखवली असताना, प्रत्यक्षात अपेक्षित काम दिसले नाही, असा आरोप त्यांनी केला. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी, लेखापरीक्षण आणि तांत्रिक स्थळ पाहणी करावी. निविदेसह माहिती माध्यमांवर जाहीर करावी. दोषी अधिकारी, कंत्राटदारांकडून रक्कम वसूल करावी, अशी मागणी जैन यांनी केली.

दरम्यान, वन विभागाने हे आरोप एकतर्फी आणि दिशाभूल करणारे असल्याचे स्पष्ट केले आहे. मियावाकी पद्धतीने वृक्षलागवड मंजूर निविदा, दर आणि मार्गदर्शक सूचनांनुसारच करण्यात आली. खर्चात जागेची पूर्वतयारी, माती सुधारणा, सिंचन, रोपे, देखभाल व संरक्षण यांचा समावेश आहे. साडेबारा कोटी रुपयांचा खर्च झालेला नसून कामे टप्प्याटप्प्याने सुरू आहेत, अशी माहिती पुण्याचे उपवनसंरक्षक अभिजित वायकोस यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.