तरुणांनी क्षमता ओळखाव्यात

Contributed by: नाशिक,म. टा. प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•

पाच दिवस सांस्कृतिक महाकुंभ

तरुणांनी क्षमता ओळखाव्यात
आपल्याला जे करायला आवडतं, ते आपल्याला जमेलच असं नाही. त्यामुळे आपल्याला काय आवडतं त्यापेक्षा आपल्याला काय करता येईल, हे पाहून आपली क्षमता आधी ओळखावी, असा सल्ला अभिनेते प्रशांत दामले यांनी विद्यार्थ्यांना दिला. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात आयोजित २२ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय युवक महोत्सव ‘इंद्रधनुष्य २०२६’ च्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. विद्यापीठातील ‘कविवर्य कुसुमाग्रज नगरी’ मधील ‘गोदावरी मंडपम’ सभागृहात विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण व बहिःशाल केंद्रातर्फे हा उद्घाटन कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे होते. याप्रसंगी व्यासपीठावर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय येनपुरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्यंकट गिते, मुक्त विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, लोकभवन निरीक्षक समितीचे अध्यक्ष डॉ. विलास पाध्ये, वित्त समिती अध्यक्ष डॉ. विकास देसाई, नाशिकचे उपमहापौर विलास शिंदे, कुलसचिव प्रा. सुरेंद्र पाटोळे, वित्त अधिकारी डो. गोविंद कतलाकुटे, परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रशांत दामले पुढे म्हणाले की, समांतर आणि प्रायोगिक अशा दोन्ही रंगभूमीवर मी काम केले. या दोन्ही रंगभूमीवर काम करण्यासाठी सतत शिकत राहण्याची गरज असते. शिकलेली कुठलीही गोष्ट कधी वाया जात नाही. त्यामुळे सतत वेगवेगळ्या गोष्टी शिकत राहण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. अभिनय क्षेत्रात येण्यासाठी वाचन, स्पष्ट शब्दोच्चार, आवाजासाठी प्राणायाम अशा गोष्टींचा अवलंब करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. मुक्त विद्यापीठाचे शिक्षणक्रम जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. त्याचसाेबत यासाठी आपल्या फेसबुक पेजवरून प्रसार करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय येनपुरे म्हणाले की, सध्याच्या अस्थिर, धकाधकीच्या आणि तंत्रज्ञानावर आधारित जीवनशैलीमध्ये तरुणांनी जबाबदारी, संयम आणि श्रद्धा यावर लक्ष केंद्रित करावे. हा काळ जागतिक बदलांचा काळ आहे. त्यामुळे या बदलांसाठी स्वत:ला तयार ठेवण्याची आपली जबाबदारी आहे. अशा काळात आपल्या स्वप्नांना आकार देण्यासाठी विचारांची स्पष्टता हवी. अमली पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. उपमहापौर विलास शिंदे यांनी आपल्या भाषणात मुक्त विद्यापीठ हे वंचितांचे शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करणारे ज्ञानमंदिर असल्याचे मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे म्हणाले की, ‘इंद्रधनुष्य’ ने महाराष्ट्राला अनेक कलाकार दिले आहेत. आयुष्यात प्रत्येकाने अंगी एक कला तरी बाळगावी असे आवाहनही त्यांनी केले.
या महोत्सवाचा शुभारंभ विद्यापीठ ज्ञानस्त्रोत केंद्र ग्रंथालय ते यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापर्यंत भव्य शोभायात्रेने झाला. त्यात सहभागी विविध विद्यापीठांनी वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित शोभायात्रा काढून व त्यावर आधारित पथनाट्य सादर करून महोत्सवाची रंगत वाढवली. विद्यार्थी कल्याण व बहिःशाल केंद्राचे संचालक डॉ. दयाराम पवार यांनी प्रास्ताविक केले. सांस्कृतिक समन्वयक प्रा. दत्ता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव प्रा. सुरेंद्र पाटोळे यांनी आभार मानले.

महाराष्ट्रातील २७ विद्यापीठांचे ४८६ विद्यार्थिनी, ६३७ विद्यार्थी मिळून १,१२३ व संघव्यवस्थापकसह जवळपास १,२५० जण या सांस्कृतिक महाकुंभात सहभागी झाले आहेत. संगीत, नृत्य, वाड्मयीन, रंगमंचीय कला विभाग, ललित कला, लघुपट व शोभायात्रा अशा सात प्रमुख कला प्रकारांतर्गत विविध २९ स्पर्धा या पाच दिवसांत होणार आहेत. या महोत्सवात पहिल्या दिवशी भारतीय लोकसंगीत वाद्यवृंद आणि सुगमसंगीत स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.