प्रौढ मित्रमंडळ अध्यक्षपदी डॉ. पाटील

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
प्रौढ मित्रमंडळ अध्यक्षपदी डॉ. पाटील
नाशिक : कॉलेजरोड येथील प्रौढ मित्रमंडळाची विशेष सर्वसाधारण सभा होऊन त्यात सन २०२६ ते २०२९ अशा तीन वर्षांसाठी नवीन कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली. मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद पाटील यांची पुन्हा एकदा एकमताने निवड करण्यात आली. सभेत मंडळाच्या उपाध्यक्षपदी मार्तंड पिंगळे, सचिवपदी प्रा. डॉ. लक्ष्मीकांत भट, सहसचिवपदी रवी कळवणकर, खजिनदारपदी दीपक भंडारी यांची, तर कार्यकारिणी सदस्यपदी अरविंद चौधरी, आशा चौधरी, शोभना आहेर, प्रकाश गोसावी, प्रल्हाद नेहेते, अरुण अडावदकर यांची निवड करण्यात आली. महिला समितीप्रमुखपदी मृदुला पिंगळे, वेल्फेअर समितीप्रमुखपदी चंद्रकांत गुजराथी, सल्लागार समितीप्रमुखपदी नंदू कोळपकर यांचीही निवड झाली.

अर्शद शेख यांचे
आज व्याख्यान

नाशिक : डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेचे १५५ वे पुष्प शुक्रवारी (दि. २०) सायंकाळी ६ वाजता गुंफले जाणार असून, त्यात वास्तुविशारद, लेखक, पत्रकार अर्शद शेख ‘भारताच्या संकल्पनेची चळवळ’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. एम्स चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सार्वजनिक वाचनालयाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात हे व्याख्यान होईल. नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अजमल खान, श्यामला चव्हाण यांनी केले आहे.

व्यवसाय परीक्षेतील

उत्तीर्णांचा सोहळा

नाशिक : अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा जुलै २०२६ मध्ये उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थींसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उद्या (२१ नोव्हेंबर) सायंकाळी ४ वाजता पदवीदान समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या पदवीदान समारंभास प्रशिक्षणार्थी व पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक रवींद्र मुंडासे यांनी केले आहे.

पाणीचोरी प्रकरणी

अधिकाऱ्यांची बैठक

मालेगाव : गुगूळवाड येथील पाझर तलावातील पाणीचोरी थांबविण्यासह तलावाचे मोजमाप, संपादित क्षेत्राचा ताबा, विहिरी जप्ती, जलजीवन मिशनमधून पाणीपुरवठा आणि रस्त्याच्या कामांसाठी ग्रामस्थांसह २ डिसेंबरपासून बेमुदत उपोषणाचा इशारा आर. डी. निकम यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर गटविकास अधिकारी सतीश धस यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. पाणीचोरी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सांगण्यात आले. जलजीवन मिशन प्रस्तावासाठी सर्वेक्षण होणार असून पाझर तलाव मोजणीसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करण्यात आला. प्रशासनाच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.

ठाकरे गटाचे

धुळ्यात आंदोलन

धुळे : मुंबईतील पत्रकार परिषदेत सोनिया गांधी यांच्या पुस्तकाच्या प्रती फाडून निषेध नोंदवताना शायना एन.सी. यांच्या हातून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाटल्याचा आरोप शिवसेना (उबाठा) पक्षाने केला आहे. याच्या निषेधार्थ धुळ्यात राणा प्रताप चौकात ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. शिवसेना संपर्कप्रमुख अशोक धात्रक यांच्या नेतृत्वाखाली घोषणाबाजी झाली.